सामाजिक विकासासाठी भौतिक प्रगती बरोबरच सांस्कृतिक विकास देखील महत्त्वाचा – डॉ.सुधीरजी तांबे
सामाजिक विकासासाठी भौतिक प्रगती बरोबरच सांस्कृतिक विकास देखील महत्त्वाचा – डॉ.सुधीरजी तांबे

संगमनेर । प्रतिनिधी । कवी अनंत फंदी हे महाराष्ट्राच्या मातीतील एक अनमोल प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व असून त्यांनी महाराष्ट्राची प्रसिद्ध लोककला तमाशा यामध्ये सक्रियपणे सहभागी होऊन मनोरंजना बरोबरच नीती शिक्षण तसेच सांस्कृतिक जीवनमूल्य रुजविण्याचे महान कार्य त्यांनी केले असल्याचे मत डॉ.सुधीरजी तांबे यानी व्यक्त केले. कवी अनंत फंदी प्रतिष्ठान व सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय तसेच भाऊसाहेब गुंजाळ पाटील सहयाद्री ज्यु. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ‘वाद-विवाद स्पर्धा’आयोजित करण्यात आली होती. या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे मा.आ.डॉ सुधीरजी तांबे हे होते.

कवी अनंत फंदी यांनी लावणी बरोबरच समाजातील ज्वलंत विषयावर पोवाड्यांची रचना करुन मराठी साहित्य आजरामर केले आहे. पेशवे दरबारात राजाश्रय लाभलेले सुप्रसिद्ध शाहीर अनंत फंदी यांनी आपल्या शाहिरी कवणांच्या माध्यमातून संगमनेर व महाराष्ट्राचे नाव आखिल भारतीय पातळीवर पोहचविल्याचे मत डॉ.तांबे यांनी व्यक्त केले.या प्रसंगी कवी अनंत फंदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजेंद्र भंडारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना कवी अनंत फंदी यांच्या जीवन कार्याची माहिती देऊन उपस्थित सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेसाठी कवी अनंत फंदी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री.सुनिल चांडक, सचिव श्री.अरुण ताजणे, श्री.जसपाल डंग, सुरेश परदेशी, एस.एम.बी.एस.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.बाळासाहेब वाघ, भाऊसाहेब गुंजाळ सह्याद्री ज्यु. कॉलेजचे प्राचार्य प्रा.एस.एम.खेमनर, उपप्राचार्य प्रा.संजय सुरसे, नॅक समन्वयक डॉ.लक्ष्मण घायवट, आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी डॉ.रावसाहेब ननवरे, डॉ.जितेंद्र पाटील, संदीप वाकचौरे परीक्षक म्हणून उपस्थित होते.




