संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठीचा मार्ग मोकळा; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश!
एसटी महामंडळाकडून स्मारकासाठीची जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठीचा मार्ग मोकळा; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश!


एसटी महामंडळाकडून स्मारकासाठीची जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित
संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर शहराच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक आणि आनंदाचा ठरला आहे. शहराच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रयत्नांना आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एसटी महामंडळ आणि संगमनेर नगरपालिका यांच्यात जागा हस्तांतरणाचा करार आज करण्यात आला असून, एसटी महामंडळाने स्मारकासाठी निश्चित केलेली जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित केली आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.यावेळी नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, राज्य परिवहन महामंडळ अहिल्यानगरचे श्री. राजेंद्र दामोधर जगताप, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासह नगरसेवक विश्वासराव मुर्तडक, किशोर टोकसे, शैलेश कलंत्री, किशोर पवार आदी उपस्थित होते.

या स्मारकासाठी २०१८ साली तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात संगमनेर नगरपालिकेने ठराव केला होता. त्यानंतर बसस्थानक परिसरात जागा मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, एसटी महामंडळाच्या धोरणात्मक अडचणींमुळे जागा हस्तांतरित करण्यास विलंब झाला. दरम्यान, २०२३ साली आमदार सत्यजीत तांबे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व परिवहन मंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संगमनेर बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत ६ मीटर बाय ४ मीटर जागा स्मारकासाठी देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच स्मारकाच्या परिसरात गार्डन आदी सुविधा विकसित करण्यासही परवानगी देण्यात आली.आमदार सत्यजीत तांबे म्हणाले, “२०१८ पासून या स्मारकासाठी पाठपुरावा सुरू आहे. अतिरिक्त जागेचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या विचाराधीन असल्याने त्यासाठी आणखी किती काळ थांबायचे, हा प्रश्न होता. त्यामुळे उपलब्ध झालेल्या जागेत स्मारकाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपालिकेने यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून पुतळ्याची निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. संगमनेरकरांच्या मतानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज एसटी महामंडळ आणि नगरपालिकेतील करारामुळे या ऐतिहासिक कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत आहे.”स्मारकाच्या कामासाठी आवश्यक असलेली उपलब्ध जागा आता नगरपालिकेकडे आल्याने चौथरा, पुतळा आणि इतर प्राथमिक कामे सुरू करता येणार आहेत. पुतळ्याच्या अंतिम मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच अश्वारूढ पुतळा उभारणीच्या कामालाही गती मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकांसाठी ५० लाखांचा निधी
संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांच्या कामासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या माध्यमातून ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या दोन्ही महापुरुषांच्या स्मारकांचे काम दर्जेदार आणि भव्य स्वरूपात व्हावे, यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका आमदार तांबे यांनी जाहीर केली आहे.
अतिरिक्त २२०० चौरस फूट जागेसाठी पाठपुरावा सुरूच
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक परिसराच्या विकासासाठी संगमनेर नगरपालिकेने एसटी महामंडळाकडे अतिरिक्त २२०० चौरस फूट जागेची मागणी केली आहे. या अतिरिक्त जागेचा प्रस्ताव सध्या एसटी महामंडळाच्या विचाराधीन आहे. या जागेत गार्डन व परिसराचा सर्वांगीण विकास करता यावा, यासाठी अतिरिक्त जागा मिळेपर्यंत आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे. दरम्यान, उपलब्ध झालेल्या जागेत स्मारकाचे काम थांबवले जाणार नसून ते पुढे नेण्यात येणार आहे.



