जिल्हा परिषद बहादराबादच्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांना भेट !


जिल्हा परिषद बहादराबादच्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांना भेट !

कोपरगाव । प्रतिनिधी । तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहादराबाद येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नुकतीच उत्साहात पार पडली. या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा, ऐतिहासिक वास्तू आणि निसर्गाचा जवळून अनुभव घेतला.

सहलीची सुरुवात बाराव्या ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर दर्शनाने झाली. मंदिराचे कोरीव काम आणि आध्यात्मिक वातावरण पाहून विद्यार्थी भारावून गेले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहून प्राचीन शिल्पकलेची माहिती घेतली.सहलीचा पुढचा टप्पा म्हणजे अभेद्य देवगिरी (दौलताबाद) किल्ला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी किल्ल्याचा परिसर, भारत माता मंदिर आणि मेंढा तोफ पाहिली. इतिहासाची पाने प्रत्यक्ष डोळ्यासमोर उलगडत असल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात होता.

दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी सिद्धार्थ गार्डन,मत्स्यालय व प्राणीसंग्रहालय तेथील विविध प्राणी, पक्षी आणि फुलझाडे पाहून मनसोक्त आनंद लुटला. गार्डन मधील विविध खेळण्यांचा आस्वाद घेतला.त्यानंतर भेळीवर यथेच्छ ताव मारला.संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर येथील बीबी का मकबरा या भव्य वास्तूला भेट दिली. मोगलकालीन स्थापत्यशास्त्राचा हा उत्तम नमुना पाहून विद्यार्थ्यांनी या वास्तूच्या इतिहासाबाबत जाणून घेतले. श्री.दत्तात्रय गव्हाणे यांच्याकडून सर्व मुलांना रात्री जेवणाची सोय करण्यात आली.या सहलीसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.संतोष पारासुर उपशिक्षिका श्रीमती सुनीता गुंजाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे विशेष सहकार्य लाभले. पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेली ही सहल विद्यार्थ्यांच्या सदैव स्मरणात राहील.



