कौशल्याला प्रमाणपत्राची जोड – मा.आ.डॉ.सुधीर तांबे

संगमनेर तालुक्यातील १७९ उमेदवारांची परीक्षा पार पडली
संगमनेर । प्रतिनिधी । कौशल्याच्या जोरावर विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मात्र औपचारिक शैक्षणिक प्रमाणपत्राअभावी रोजगाराच्या चांगल्या संधींपासून वंचित राहणाऱ्या कामगारांसाठी जयहिंद लोकचळवळ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजापूर, ता. संगमनेर येथे परीक्षा पार पडली. संगमनेर तालुक्यातील १७९ उमेदवारांनी या परीक्षेस सहभाग नोंदविला.

इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मेकॅनिक, वायरमन, विणकाम, शिवणकाम, टेलरिंग आदी विविध क्षेत्रांत अनेक नागरिक आपल्या अनुभवातून आणि कौशल्यातून उत्तम काम करीत आहेत. मात्र, त्यांच्या कौशल्याला अधिकृत शैक्षणिक प्रमाणपत्राची जोड नसल्यामुळे रोजगाराच्या तसेच पुढील प्रगतीच्या अनेक संधींपासून त्यांना वंचित राहावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन पूर्व शिक्षण मान्यता मूल्यांकन केंद्राच्या माध्यमातून कौशल्य आणि अनुभवाला शैक्षणिक मान्यता मिळवून देण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमाच्या नियोजनासाठी ११ एप्रिल २०२६ रोजी सह्याद्री महाविद्यालय, संगमनेर येथे प्राथमिक बैठक घेण्यात आली होती. यावेळी जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक डॉ. सुधीरजी तांबे, पूर्व शिक्षण मान्यता केंद्राचे संचालक डॉ. राम ठाकर, विद्यार्थी सेवा विभागाचे डॉ. प्रकाश देशमुख, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रशासकीय संयोजक अतिक शेख तसेच जयहिंद लोकचळवळीचे समन्वयक उबेदभाई शेख उपस्थित होते. झालेल्या परीक्षेत पात्र उमेदवारांच्या कौशल्याचे मूल्यांकन करण्यात आले. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून, त्यामुळे त्यांच्या कौशल्याला शैक्षणिक ओळख मिळण्याबरोबरच रोजगाराच्या आणि पुढील शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजापूरचे प्राचार्य एस. जी. कुमावत सर आणि पर्यवेक्षक बडगुजर सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी बोलताना डॉ.सुधीर तांबे यांनी सांगितले की, “कौशल्य आणि अनुभव असूनही केवळ प्रमाणपत्राच्या अभावामुळे कोणालाही संधीपासून वंचित राहावे लागू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून कौशल्याधारित काम करणाऱ्या नागरिकांच्या कष्टाला अधिकृत ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न असून, या प्रमाणपत्रामुळे त्यांच्या आयुष्याला शिक्षण, रोजगार आणि प्रगतीची नवी दिशा मिळेल.” कौशल्याला प्रमाणपत्राची जोड देत स्वावलंबन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारा हा उपक्रम अनेक कष्टकरी नागरिकांसाठी आशेचा किरण ठरणार आहे.