जनतेचे दुःख दूर होऊन सर्वांच्या जीवनात सुख, समाधान व आनंद नांदो !
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना

जनतेचे दुःख दूर होऊन सर्वांच्या जीवनात सुख, समाधान व आनंद नांदो !


माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना

संगमनेर शहरातील देवी गल्ली येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांनी सहभाग घेत जगदंबा मातेचे दर्शन घेतले आणि आरती केली. यावेळी नगराध्यक्षा डॉ.मैथिलीताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, किशोर टोकसे यांच्यासह शहरातील नगरसेवक, विविध पदाधिकारी आणि देवी गल्ली देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, यंदा अत्यल्प पावसामुळे दुष्काळाची तीव्रता वाढली असून पिके करपल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असला तरी आगामी काळात हे पाणी अत्यंत काटकसरीने वापरण्याची गरज आहे. दुष्काळामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत असून अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेच्या जीवनात दिलासा मिळणे महत्त्वाचे आहे.

वर्षभर कष्ट, अडचणी आणि विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र दसरा आणि दिवाळीसारखे सण आनंदाने साजरे करून नव्या उत्साहाने पुन्हा कामाला लागण्याची आपली परंपरा आहे. यंदाच्या वर्षात सर्व नागरिकांच्या अडचणी दूर होऊन प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद नांदो अशी मनापासून प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.नगराध्यक्षा डॉ.मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरातील नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध आहे. शहरात आनंद, समृद्धी आणि भरभराटीचे वातावरण कायम राहावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, तालुक्यात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे. देवी गल्लीतील जगदंबा मातेचे स्थान भाविकांचे श्रद्धास्थान असून या उत्सवानिमित्त परिसरातील नागरिक एकत्र येऊन मातेची पूजा करतात. सर्वांनी एकत्र येऊन भक्तिभावाने उत्सव साजरा करणे ही आनंदाची बाब आहे. देवी गल्लीतील जगदंबा मातेच्या नवरात्रोत्सवाला दरवर्षी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. यंदाही उत्सवाच्या निमित्ताने शहर व परिसरातील नागरिक, महिला आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



