आईच्या स्मृतींना हिरवागार सलाम! ‘आशाई गार्डन’चे उद्घाटन
सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर; एसएस मिल्क चिलिंग प्लांटचा पर्यावरणपूरक उपक्रम

आईच्या स्मृतींना हिरवागार सलाम! ‘आशाई गार्डन’चे उद्घाटन


सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर; एसएस मिल्क चिलिंग प्लांटचा पर्यावरणपूरक उपक्रम
कोपरगाव । प्रतिनिधी । पर्यावरणाचे संवर्धन, पाण्याची बचत आणि आईच्या स्मृतींचे जतन अशा भावनिक व सामाजिक संदेशाचा सुंदर संगम साधत एसएस मिल्क चिलिंग प्लांट येथे ‘आशाई गार्डन’ साकारण्यात आले आहे. प्लांटमधून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याच्या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या या गार्डनचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून त्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन एसएस मिल्क चिलिंग प्लांटमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ईटीपी (Effluent Treatment Plant) यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे सांडपाण्यावर आवश्यक प्रक्रिया करून त्याचा वापर प्लांट परिसरातील गार्डनमधील झाडांना पाणी देण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे पाण्याचा पुनर्वापर साधण्याबरोबरच परिसर हिरवागार ठेवण्याचा सकारात्मक प्रयत्न करण्यात आला आहे.

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, गार्डनला कुटुंबाच्या प्रिय आईच्या स्मृतींना समर्पित करून ‘आशाई गार्डन’ असे नाव देण्यात आले आहे. आई आज आपल्यात नसली, तरी तिचे प्रेम, संस्कार आणि आठवणी सदैव जिवंत राहतात. या भावनेतून साकारलेले हे गार्डन म्हणजे आईच्या स्मृतींना अर्पण केलेली एक अनोखी मानवंदना ठरत आहे. गार्डनमधील प्रत्येक रोपटे आणि फुलणारे प्रत्येक फूल आईच्या आठवणींचा हिरवागार वारसा जपत राहील.

पर्यावरण संवर्धनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे, पाण्याची बचत करणे आणि निसर्गाशी नाते अधिक दृढ करणे, हा या उपक्रमाचा मुख्य संदेश आहे. औद्योगिक कामकाजासोबत पर्यावरणाप्रती सामाजिक जबाबदारी जपण्याचा आदर्श एसएस मिल्क चिलिंग प्लांटने या उपक्रमातून घालून दिला आहे.या उद्घाटनप्रसंगी भाजपचे कोपरगावचे माजी तालुकाध्यक्ष कैलास रावण रहाणे, बहादरपूर ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ निवृत्ती रहाणे, एसएस मिल्कचे चेअरमन सचिन दिलीप रहाणे, संतोष निवृत्ती गव्हाणे, रुद्र दूध संकलनचे चेअरमन शिवहरी रहाणे, गणेश चिने, शशिकांत झिंझुरडे, प्रवीण बाळासाहेब रहाणे तसेच एसएस मिल्कचे सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होता.
‘आशाई गार्डन’ हे केवळ एक गार्डन नसून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प आणि आईच्या प्रेमाच्या आठवणी जपणारा हिरवागार वारसा आहे.



