मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलतीसाठी शासन कटिबध्द- ना. विखे पाटील

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलतीसाठी शासन कटिबध्द- ना. विखे पाटील


मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलतीसाठी शासन कटिबध्द- ना. विखे पाटील
शिर्डी । प्रतिनिधी । मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला असून योजनांच्या अंमलबजावणीतील अडथळे दुर करून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपसमिती अध्यक्ष मंत्री विखे पाटील यांनी सर्व विभागाला दिले.

सह्याद्री अतिथिगृह येथे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. यावेळी उपसमितीचे सदस्य मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री दादाजी भुसे, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, उपसमितीचे सचिव श्री. आप्पासो धुळाज, वैद्यकिय शिक्षण विभागाचे सचिव श्री.धिरजकुमार, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व कृत्रिम बुध्दीमत्ता विभागाचे सचिव श्री. विरेंद्रसिंग, महाआयटीच्या आयुक्त श्रीमती एस.भुवनेश्वरी, सारथी संस्था, मराठा आरक्षण कक्ष व मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते.उपसमितीचे सचिव श्री.आप्पासो धुळाज यांनी बैठकीत विविध योजनांबाबत सादरीकरण केले. शैक्षणिक सवलती लागू करण्यासाठी आवश्यक ते सर्व शासन निर्णय तात्काळ काढण्यात यावेत. आवश्यकता असल्यास विभागाने प्रस्तावित शैक्षणिक सवलती आणि शिष्यवृत्ती योजनांसाठी आगामी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे आर्थिक तरतूद करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतींसाठीची मोटार वाहन चालक-वाहक प्रशिक्षण योजना केवळ पुणे येथे केंद्रित न ठेवता जिल्हास्तरावर राबवावी. त्यासाठी ‘सारथी’ने जाहिरात प्रसिद्ध करून इच्छूक संस्थांचे अर्ज मागवावेत, असेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

इयत्ता ५वी ते १० वी या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शालेय शिक्षण विभागामार्फत शिष्यवृत्ती योजना, परराज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्काव्यतिरिक्त प्रयोगशाळा शुल्क, ग्रंथालय शुल्क इत्यादी १६ बाबींची प्रतिपुर्ती, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळण्यास पात्र असणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी मराठा समाजातील विद्यार्थीही पात्र ठरणार आहेत. त्यामुळे पालकांवरील शिक्षणाच्या खर्चाचा मोठा भार हलका होईल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.



