विखे पाटलांचा शब्द ठरला खरा; ४८८ कामगारांच्या आयुष्यात आनंदाची पहाट!

विखे पाटलांचा शब्द ठरला खरा; ४८८ कामगारांच्या आयुष्यात आनंदाची पहाट!


विखे पाटलांचा शब्द ठरला खरा; ४८८ कामगारांच्या आयुष्यात आनंदाची पहाट!
शिर्डी । प्रतिनिधी । कामगारांनी श्रद्धा आणि सबुरीने केलेल्या संघर्षाला मोठे यश मिळाले असून, विश्वासाने दाखवलेल्या एकजुटीमुळे आनंदाचा क्षण तुमच्या सर्वांच्या जीवनात आला आहे. या यशात अनेकांचे योगदान आहे. मात्र, आता वाढलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून काम करा, असा सल्ला जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

शिर्डी संस्थान मधील ४८८ कामगारांना सेवेत कायम करण्याच्या संदर्भात न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिला. मंत्रालय स्तरावर मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कामगार संघटनेच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, नगराध्यक्षा सौ. जयश्री थोरात, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपनगराध्यक्ष अभय शेळके, कामगारांच्या पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी कामगारांच्या वीस वर्षांच्या लढ्याचा उल्लेख केला. सर्व कामगार विश्वासाने एकत्र राहिले, ही महत्त्वाची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे हे साध्य होऊ शकले. अनेकांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला; मात्र श्रद्धा आणि सबुरीच्या मंत्राने तुम्ही यश मिळवले, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी १,०५२ कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेताना तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी मोठे धाडस दाखवले होते. स्व. जयंतराव ससाणे आणि मी पाठपुरावा केला, तेव्हा पहिला निर्णय होऊ शकला. त्यावेळीही अनेकजण देव पाण्यात घालून बसले होते. मात्र, मनात काम करण्याची प्रामाणिक भावना असेल, तर साईबाबा पाठीशी उभे राहतात, असेही त्यांनी नमूद केले.शिर्डीसाठी कोणताही निर्णय घेताना स्वार्थ कधीही मनाला शिवला नाही. तसे संस्कार वाडवडिलांनी केले नाहीत. सामाजिक बांधिलकीने काम करत राहिलो, म्हणून अनेक वर्षे या भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत गेली. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करायची; मात्र जनतेशी प्रतारणा करायची नाही, हीच भूमिका कामगारांच्या लढ्यातही ठेवली, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.कामगारांची जबाबदारी आता वाढली आहे. शिर्डीत येणाऱ्या भाविकांचे तुम्ही कशा पद्धतीने स्वागत करता, यावर शिर्डीचा नावलौकिक अधिक वाढणार आहे. देशात अनेक आध्यात्मिक क्षेत्रे विकसित झाली आहेत. भाविक आपल्या श्रद्धेनुसार विविध ठिकाणी जात असतात. त्यामुळे शिर्डीत चांगले वातावरण, सुरक्षा आणि स्वच्छता राखण्याचे आव्हान तुम्हाला स्वीकारावे लागणार आहे, असे आवाहन त्यांनी केले.शिर्डी परिसराचा विकास चांगल्या पद्धतीने होत आहे. विमानतळ आणि बाह्यवळण रस्त्याची कामे करताना अनेक अडचणी आल्या. त्यावर टीकाही झाली; मात्र या कामांचे महत्त्व आज सर्वांना समजले आहे. निळवंडेचे पाणी आल्यामुळे दुष्काळातही दिलासा देता आला. अन्य ठिकाणी परिस्थिती भयानक असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात अनेक वर्षांच्या आरोपांना आणि टीकेला आता पूर्णविराम मिळाला असून, शब्दपूर्तीचा आजचा दिवस आहे, असे सांगितले. विखे परिवाराला जनतेचे जे प्रेम मिळते, त्याची उतराई करण्याचे काम आम्ही करीत आहोत. ना. विखे पाटील यांच्यावर विश्वास ठेवला, त्याचे फळ आज कामगारांना मिळाले आहे, असे त्यांनी नमूद केले.याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि विठ्ठलराव पवार यांचीही भाषणे झाली.



