ब्रेकिंग

चेहऱ्याच्या गंभीर फ्रॅक्चरवर तीन यशस्वी शस्त्रक्रिया; डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना नवा दिलासा!

जबडा, गाल आणि चेहऱ्याच्या हाडांच्या गुंतागुंतीच्या फ्रॅक्चरवर आधुनिक ORIF तंत्राद्वारे उपचार

चेहऱ्याच्या गंभीर फ्रॅक्चरवर तीन यशस्वी शस्त्रक्रिया; डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना नवा दिलासा!

जबडा, गाल आणि चेहऱ्याच्या हाडांच्या गुंतागुंतीच्या फ्रॅक्चरवर आधुनिक ORIF तंत्राद्वारे उपचार

अहिल्यानगर । विनोद जवरे । चेहऱ्याला झालेली गंभीर दुखापत ही केवळ बाह्य स्वरूपापुरती मर्यादित नसते. अशा दुखापतींमुळे बोलणे, अन्न चावणे, जबड्याची हालचाल आणि चेहऱ्याच्या नैसर्गिक रचनेवरही परिणाम होऊ शकतो. अशाच गुंतागुंतीच्या दुखापतींवर मात करण्यासाठी डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय, अहिल्यानगर येथील प्लास्टिक सर्जरी विभागाने तीन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. विशेष म्हणजे, या तिन्ही रुग्णांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांचा लाभ मिळाला.या तीन रुग्णांच्या दुखापतींचे स्वरूप वेगवेगळे होते. पहिल्या रुग्णाच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूच्या वरच्या जबड्याचे (Maxilla), खालच्या जबड्याचे (Mandible) आणि गालाच्या हाडाचे (Zygomatic Bone) फ्रॅक्चर झाले होते. दुसऱ्या रुग्णाच्या खालच्या जबड्याचे, तर तिसऱ्या रुग्णाच्या गालाच्या हाडाचे फ्रॅक्चर झाले होते. प्रत्येक रुग्णाच्या दुखापतीचे स्वरूप, हाडांची स्थिती आणि संभाव्य गुंतागुंत लक्षात घेऊन डॉक्टरांनी स्वतंत्र शस्त्रक्रिया नियोजन केले.

चेहऱ्याचा नैसर्गिक आकार आणि जबड्याची कार्यक्षमता टिकवण्यावर भर

या शस्त्रक्रियांसाठी ORIF (Open Reduction and Internal Fixation) या आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला. या तंत्रामध्ये फ्रॅक्चर झालेली हाडे योग्य स्थितीत आणून विशेष वैद्यकीय प्लेट्स आणि स्क्रूच्या साहाय्याने स्थिर केली जातात. यामुळे हाडांची योग्य जुळणी होण्यास मदत होते. चेहऱ्याची नैसर्गिक रचना, दातांची जुळणी आणि जबड्याची कार्यक्षमता पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने ही उपचारपद्धती महत्त्वाची ठरते.प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अजित काळे, तसेच डॉ. धीरज जुमडे आणि डॉ. अश्विन वानखेडे यांनी या शस्त्रक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. चेहऱ्याच्या विविध हाडांना झालेल्या दुखापतींवर अचूक उपचार करताना वैद्यकीय कौशल्यासोबतच सूक्ष्म शस्त्रक्रिया नियोजनाची आवश्यकता असते. डॉक्टरांच्या समन्वयातून तिन्ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या.

महागड्या उपचारांचा आर्थिक भार टळला

चेहऱ्याच्या हाडांच्या गुंतागुंतीच्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रिया करताना विशेष उपकरणे, वैद्यकीय साहित्य आणि तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते. मात्र, या तिन्ही रुग्णांवर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे रुग्णांना आवश्यक आधुनिक उपचार मिळण्याबरोबरच उपचारांच्या खर्चातूनही दिलासा मिळाला.डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने आणि वैद्यकीय संचालक डॉ. अभिजीत दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात विशेष वैद्यकीय सेवांच्या बळकटीकरणावर भर दिला जात आहे.

चेहऱ्याच्या गंभीर दुखापतींवर अत्याधुनिक शस्त्रक्रिया सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणे ही अहिल्यानगर आणि परिसरातील रुग्णांसाठी दिलासादायक बाब आहे. प्लास्टिक सर्जरी विभागाच्या या यशस्वी शस्त्रक्रियांमुळे गुंतागुंतीच्या चेहऱ्याच्या फ्रॅक्चरवरील तज्ज्ञ उपचार रुग्णालयात उपलब्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!