श्रेयस तळपदे व प्रार्थना बेहरेची मेधात धमाल
श्रेयस तळपदे व प्रार्थना बेहरेची मेधात धमाल
संगमनेर । विनोद जवरे ।
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव असलेल्या मेधा 2023 मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांसमवेत सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत धमाल केली.
अमृतवाहिनीच्या मेधा मैदानावर झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळी संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. हसमुख जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,व्यवस्थापक प्रा.व्ही.बी.धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम.ए.वेंकटेश, मेधाचे समन्वयक प्रा.जी.बी.काळे, प्राचार्य डॉ.मच्छिंद्र चव्हाण, डॉ.मनोज शिरभाते, डॉ. बाबासाहेब लोंढे, प्रा एस.टी. देशमुख, सौ जे बी शेट्टी, श्रीमती शितल गायकवाड, श्रीमती अंजली कण्णावार, प्रा.विलास शिंदे, प्रा.अशोक वाळे, नामदेव गायकवाड आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत भूमीचा गौरव करणारी नाटिका सादर झाली.यानंतर भांगडा, बिहू नृत्य, संभळ नृत्य गोंधळ याचबरोबर लहान मुलांच्या पारंपारिक वेशातील फॅशन शो ने धमाल केली. इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हॉरर शो ने अंगावर शहारे आणले. अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवछत्रपती काळाचे वर्णन करणाऱ्या पोवाड्याचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. रामायण महाभारतातील कथासह वेशभूषा हे आकर्षण ठरले. याचबरोबर डी फार्मसी व बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले फ्युजन डान्सला टाळ्यांचा कडकडून प्रतिसाद मिळाला. पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मराठी गीतांवरील सामूहिक नृत्यांनी सर्वांना ठेका धरायला लावला. इंजिनिअरिंग कॉलेजच्या फ्युजन सॉंग वर सिने अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी ठेका धरला.
यावेळी बोलताना श्रेयस तळपदे म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील अमृतवाहिनी संस्था ही गुणवत्तेमुळे महाराष्ट्रात पोहोचली आहे. गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकासासाठी मेधा व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जीवनात अभ्यास महत्त्वाचा आहेच. पण त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकासासाठी तुमच्यातील गुण विकसित झाले पाहिजे. आणि सर्वांगीण विद्यार्थी घडवण्याचे काम अमृतवाहिनीत होत आहे. हा परिसर आणि येथील वातावरण हे मनाला भारावून टाकणारे असल्याचेही ते म्हणाले.तर प्रार्थना बेहेरे म्हणाल्या की, संगमनेर हे मोठे शैक्षणिक केंद्र झाले आहे. मी ही करिअरच्या सुरुवातीला लहान कार्यक्रमांमधून सुरुवात केली. ग्रामीण भागात खरे कलाकार असून त्यांना संधी मिळाली तर ते नक्कीच आपले नाव उज्वल करतील. मला किंवा मुंबईच्या मुलींना अमृतवाहिनी सारख्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायला नक्की आवडेल असेही त्या म्हणाल्या.
यावेळी सौ.शरयूताई देशमुख म्हणाल्या की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी 1983 मध्ये स्थापन केलेली अमृतवाहिनी संस्था ही वटवृक्ष झाली आहे. संस्थेच्या विविध विभागांना राष्ट्रीय मानांकाने मिळाले असून गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांची प्लेसमेंट ही महत्त्वाची बाजू आहे. त्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी 2016 पासून मेधा महोत्सव सुरू करण्यात आले असल्याचे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक जी.बी.काळे यांनी केले.सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर डॉ.एम.ए.व्यंकटेश यांनी आभार मानले.
रोषणाईने अमृतवाहिनी परिसर उजाळाला.
मेधा महोत्सवानिमित्त अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील सर्व विभागांमध्ये रोषणाई करण्यात आली असून सांस्कृतिक कार्यक्रमासाठीचे मेधा मैदान हे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. स्वच्छ व सुंदर परिसरासह विविध व्यवस्था, झाडांवर झालेली विद्युत रोषणाई, सजलेला परिसर यामुळे अमृतवाहिनीचे हिरवाईचे वातावरण अत्यंत खुलून गेले आहे