बंडुभाऊ जयराम थोरात यांच्या आठवणीतले कोल्हे साहेब
बंडुभाऊ जयराम थोरात यांच्या आठवणीतले कोल्हे साहेब
कोपरगांव । विनोद जवरे ।
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, दीन दलितांसह बहुजन समाजाच्या दारात शिक्षणाची गंगोत्री नेणारे कर्मवीर भाऊराव पाटील, राजर्षी शाहु महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेवुन माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी राजकीय सामाजिक जीवनांत संघर्ष करत रयत हाच परिवार मानून त्यांच्यासाठी अहोरात्र काम केले, या रयत महामानवाचा सहवास मला लाभला हे मी माझे भाग्य समजतो.
स्व. शंकरराव कोल्हे अमेरिकेत शिक्षण घेतांना त्यांची तत्कालीन राज्यपाल कॅप्टन विजया लक्ष्मी पंडीत यांची भेट झाली. त्या भेटीत त्या म्हणाल्या होत्या येथील श्रीमंतीवर जाउ नका. आपल्या देशातील गरीबी कशी दुर होईल ते बघा. स्व. शंकरराव कोल्हेंनी विचारपुर्वक कोपरगांव तालुक्यात लक्ष देवुन संजीवनी उद्योग समुह उभारला. ग्रामीण भागात कार्यकर्ते घडविले. शेतक-यांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याची, वीजेची मागणी व अन्य निकडीच्या बाबींची गरज ओळखून संघर्ष केला. गरीब, दीन-दलित, कष्टकरी, शेतकरी यांचे जीवनात अमुलाग्र बदल घडवुन आणले. ग्रामिण भागातील मुला मुलींना अभियांत्रीकी तांत्रिकीसह व्यवस्थापनातील उच्च शिक्षण मिळावे याकरीता शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. स्व. शंकरराव कोल्हे यांनी कार्य कर्तृत्वाचा वटवृक्ष उभा केला असुन अडचणींवर मात करत जीवनाची यशस्वी वाटचाल केली. त्यांच्याकडे पाहात ऐकत आपण संभाषण कला शिकलो, त्यातुन त्यांच्यासमोर केलेले भाषण व त्यातील मुददयांची पाठराखण होवुन कौतुकाची थाप मला सदैव मिळत असे.
स्व. शंकरराव कोल्हे यांचे आचार, विचार, आहार, उच्चार अतिशय साधे होते मात्र आकाशाला गवसणी घालण्याची त्यांची उमेद पराकोटीची होती. प्रतिकुल परिस्थितीवर मात करून मिळविलेल्या यशाची झालर स्व. शंकरराव कोल्हे यांना नेहमीच सुखावत असे., त्यांना त्या गोष्टीचा आत्मानंद व्हायचा. अपयशातुन खचुन न जाता त्यावर मात करीत पुढे चालत रहायचे. संभाषण कौशल्य हा त्यांच्या विचारांचा दागिना होता स्व. शंकरराव कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना दिला. त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन.
(बंडुभाऊ जयराम थोरात, जवळके
ता. कोपरगांव)