आगामी काळात काँग्रेस पक्ष पुन्हा जोमाने उभारी घेईल – माजी मंत्री आमदार थोरात
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा सत्कार
आगामी काळात काँग्रेस पक्ष पुन्हा जोमाने उभारी घेईल – माजी मंत्री आमदार थोरात
संगमनेर । विनोद जवरे ।
काँग्रेस पक्षाला त्यागाची व बलदानाची परंपरा असून स्वातंत्र्यपूर्व काळ ते आजपर्यंत काँग्रेस पक्षाचा इतिहास हा दैदीप्यमान असा राहिला आहे. पुढील काळात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करावे लागणार असून महाराष्ट्रात सध्या वातावरणात बदल होत आहे. काँग्रेस पक्षाबद्दल पुन्हा एकदा जनतेत मोठी अनुकूलता निर्माण होत असून आगामी काळात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा जोमाने उभारी घेईल असा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. राजेंद्र नागवडे यांची काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ थोरात कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी राजेंद्र नागवडे ,करण ससाने, थोरात कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, उत्कर्षताई रुपवते, सचिन गुजर ,संपतराव म्हस्के, मधुकरराव नवले,प्रतापराव शेळके,हेमंत उगले जयवंत वाघ, भैय्या वाबळे, मिलिंद कानवडे,सुरेश झावरे,सचिन चौगुले,सोन्याबापु वाकचौरे, ज्ञानदेव वाफरे, लताताई डांगे ,सौ निर्मलाताई गुंजाळ, सोमेश्वर दिवटे, संतोष हासे ,आकाश नागरे ,सुभाष सांगळे, ज्ञानेश्वर मुरकुटे, सचिन गुजर, रवींद्र कोते, सुरेश मेसे,प्रशांत दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचे विकासाचे हित जोपासणारा पक्ष असून या पक्षाने कायम समतेचा विचार अंगीकृत केला आहे. आव्हाने व अडचणी या काँग्रेस पक्षासाठी नवीन नसून पुढील काळात काँग्रेसला चांगले दिवस येणार आहे. काँग्रेस पक्षात तरुणांनाही संधी आहे. सध्या राज्यात सुरू असलेले राजकारण व सरकार जनतेला मान्य नसून आता जनतेतही पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाबद्दल अनुकूलता निर्माण होत आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर काँग्रेस पक्षाला नवचैतन्य मिळवून दिले आहे. राज्यातही शेगाव येथे राहुल गांधी यांची प्रचंड विराट सभा झाली. महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले वातावरण असून लोकसभेच्या काँग्रेसच्या जागाही यावेळेस वाढणार आहे. नागवडे कुटुंब हे कायम काँग्रेस पक्षाबरोबर राहिले आहे. शिवाजीराव नागवडे यांनी श्रीगोंदा तालुक्यात मोठे काम केलेले आहे सहकारातही त्यांचे चांगले काम आहे.सध्या राजेंद्र नागवडे कारखाना अतिशय चांगला चालवत असून अनुराधाताई नागवडे यांचे महिला संघटन ही उत्तम आहे. राजेंद्र नागवडे यांच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदीच्या निवडीचे स्वागतही त्यांनी यावेळी केले.तर करण ससाने म्हणाले की, देशाचा विकास साधायचा असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय दुसरा भक्कम पर्याय नाही. पुढील निवडणुका चांगल्या मताधिक्याने जिंकण्यासाठी काँग्रेस पक्षाला आतापासूनच निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे. राजेंद्र नागवडे म्हणाले की, संघर्ष हा काँग्रेस पक्षासाठी नवीन नाही.पुढील काळातही पक्ष मजबूत करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. सध्याच्या सरकारवर जनतेची तीव्र नाराजी असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करणे गरजेचे आहे. आमदार थोरात यांच्यामुळेच संगमनेर तालुका हा राज्यात नव्हे तर देशात अग्रमानांकित ठरला आहे असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
ज्ञानदेव वाफारे म्हणाले की, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यात व राज्यात पुन्हा एकदा उभारी घेणार आहे. राजेंद्र नागवडे हे मूळचे काँग्रेसचेच असून त्यांचे काम चांगले आहे. पुढील काळात प्रत्येक तालुक्यात काँग्रेसचे संघटन बांधण्याचे काम कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे. काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांचा पक्ष असून या पक्षाची विचारधारा व कामे तळागाळापर्यंत पोहोचवली पाहिजे. यावेळी मधुकरराव नवले ,लताताई डांगे आकाश नागरे ,भैय्या वाबळे, प्रशांत दरेकर , सुरेश मेसे , सचिन गुजर यांची ही भाषणे झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदेव वाफारे यांनी केले. तर आभार मिलिंद कानवडे यांनी मानले .