एकविराच्या वतीने बुधवारी महिला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
महिला क्रिकेट सह बॅडमिंटन कुस्ती व रस्सीखेच स्पर्धा

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील महिला व युवतींचे सबलीकरण आणि आरोग्याच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने बुधवार दि 29 मार्च ते 31 मार्च या काळात तालुक्यातील युवती व महिलांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसह कुस्ती, बॅडमिंटन व रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एकविराच्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.
महिलांच्या विविध स्पर्धा आयोजनाबाबत माहिती देताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो आहे. यानिमित्त संगमनेर तालुक्यात दरवर्षी महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. महिला या सर्व क्षेत्रात पुरुषांबरोबर काम करत आहेत हे सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. यावर्षी महिला क्रिकेट मध्ये आयपीएल सुरू होऊन त्याला जगभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. काल नुकतेच वूमन प्रीमियर लीगचे मुंबई इंडियन्स ने विजेतेपद पटकावले आहे. हे महिला क्रिकेटसाठी अभिमानास्पद आहे.जागतिक महिला दिनानिमित्त बुधवार दिनांक 29 मार्च ते 31 मार्च 2023 या काळात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे तालुक्यातील युवती व महिलांसाठी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी दहा वाजता या स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे व कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.
यामध्ये तालुक्यातील युवतींचे विविध क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. तसेच राज्यभरातूनही काही मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. या संघाना ड्रेस कोड देण्यात आले असून स्पर्धेसाठी मैदान, एलईडी व्यवस्था, कॉमेंट्री व्यवस्था, बैठक व्यवस्था, खेळाडूंसाठी स्वतंत्र व्यवस्था यांसह स्पर्धेची अद्यावत तयारी करण्यात आली आहे.याचबरोबर शालेय व महाविद्यालय विद्यार्थिनी, तरुणी व महिलांसाठी बॅडमिंटन कुस्ती व रस्सीखेच स्पर्धेचे आयोजनही याच क्रीडा संकुलात करण्यात आले आहे .यासाठीही सर्व अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.स्पर्धेच्या आयोजनासाठी एकविरा फाउंडेशन च्या वतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात जय्यत तयारी करण्यात येत असून या स्पर्धेत जास्तीत जास्त महिला तरुणी व विद्यार्थिनींनी सहभाग घ्यावा असे आवाहन एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.