

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रकाश कडलग यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समवेत जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे ,मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, कारखान्याचे संचालक मिनानाथ वर्पे ,अमृतवाहिनी बँकेचे संचालक बापूसाहेब गिरी, यांसह तालुक्यातील सेवा सोसायटी यांचे सर्व सचिव उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, जिल्हास्तरीय सचिव सदस्य समितीवर प्रकाश कडलग यांची निवड ही संगमनेर तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे. सेवा सोसायटी हा सहकाराचा पाया आहे सहकार महर्षी तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी सचिव आणि सेवा सोसायटी यांच्यासाठी खूप काम केले. त्यांनी 44 वर्षे जिल्हा बँकेवर संचालक ,राज्य बँकेवर ही काम करताना सातत्याने सचिवांच्या विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा केला अनेक प्रश्न मार्गी लावले.
अहमदनगर जिल्हा बँक ही सहकारातील एक मोठी बँक असून जिल्ह्याची आर्थिक कामधेनु आहे . जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करताना आपण जिल्ह्यातील सर्वांना सोबत घेतले. सहकाराची आदर्श तत्व जपताना संगमनेर तालुक्याने परंपरेप्रमाणे यावर्षीही 99.86% वसुली दिली आहे .या सर्व कामात सचिवांचा मोठा सहभाग असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण मंत्रिमंडळात सातत्याने पाठपुरावा केला आहे. सचिवांच्या प्रश्नांसाठी आपण पाठपुरावा करून असेही ते म्हणाले. या प्रसंगी गणपतराव सांगळे, रावसाहेब वर्पे यांनीही मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसाहेब गिरी यांनी केले तर प्रकाश कडलग यांनी आभार मानले..