बहादरपुर येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाचा जयघोष करीत दिंडी उत्साहात साजरी
बहादरपुर येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाचा जयघोष करीत दिंडी उत्साहात साजरी
कोपरगांव । विनोद जवरे ।
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बहादरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘वारी शिक्षणाची-दिंडी ग्रंथाची’ हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी वारकरी वेशभूषेत आले होते.पायी दिंडीचे प्रमुख आकर्षण म्हणजे वारी साठी सजविलेला रथ होता.रथामध्ये संतांचे फोटो,तसेच विविध धार्मिक ग्रंथ व पुस्तके ठेवण्यात आली होती.शैक्षणिक आभूषणांनी कल्पकतेने सजविलेले विठ्ठल-रखुमाई सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी हाती टाळ,विणा,मृदुंग व पताका घेऊन विविध भजनांवर ताल धरला होता. विद्यार्थीनी डोक्यावर तुळशी वृंदावन ,कलश ,ग्रंथ घेऊन सहभागी झाल्या होत्या.सोबत संत सोपान काकांची पालखीही होती.शिक्षणाचे महत्व सांगणारी घोषवाक्य व विठू नामाचा गजर यांनी सर्व परिसरात एक प्रकारचे चैतन्य निर्माण केले होते.ज्ञानोबा-माउली-तुकारामांच्या गजरात विलोभनीय पायी दिंडी सोहळा साजरा करण्यात आला.गावात ठिकठिकाणी ग्रंथरथाची व विठ्ठल-रखुमाई यांची पूजा करण्यात आली.
भगव्या पताका घेऊन विठू नामाचा जयघोष करत शाळेच्या पटांगणापासून सुरु झालेली ही ग्रंथदिंडी बहादरपूर गावातील जागृत देवस्थान श्री संत गोपाजीबाबा संजीवन समाधी मंदिरापर्यंत अतिशय उत्साहात पार पडली.मंदिर परिसरात विद्यार्थ्यांनी रिंगण करत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थिनींनी फेर धरून फुगड्या खेळून आपला आनंद व्यक्त केला.शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत डोंगरे यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना आषाढी एकादशीचे व शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास गव्हाणे यांनी केले व गणेश पाचोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षक सचिन आढांगळे,मुरलीधर वाकचौरे,शरद आहेर,सीताराम गव्हाणे,सचिन सातपुते यांनी विशेष परिश्रम घेतले.पावसातल्या रिमझिम सरीतला हा पायी दिंडी सोहळा पाहण्यासाठी पालक व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शेवटी विद्यार्थ्यांना गोड प्रसाद देऊन पायी वारीची सांगता करण्यात आली.