निळवंडेच्या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही – आमदार थोरात
निळवंडे च्या पाण्यासाठी पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष
निळवंडेच्या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही – आमदार थोरात
निळवंडे च्या पाण्यासाठी पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष
तळेगाव दिघे । विनोद जवरे ।
निळवंडे धरण हे दुष्काळी भागातील जनतेसाठी बांधले आहे. या पाण्यासाठी पिढ्यानपिढ्यांचा मोठा संघर्ष राहिला आहे .अनेक दिवसांच्या कामानंतर हे पाणी दुष्काळी भागात आल्याचा मोठा आनंद आहे. जनतेच्या समाधानाकरता आपण अविरतपणे काम करत आहे .ज्यांनी निळवंडे च्या कामात मदत केली नाही ते आता मोठमोठी भाषणे करत आहे. मात्र जनता त्यांना ओळखून आहे .आगामी काळात सर्वांना पाणी मिळेल यासाठी प्रस्ताव तयार केला असून कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही असा विश्वास निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
कोकणगाव येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून आलेल्या पाण्याचे जलपूजन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, निळवंडे पाट पाणी कृती समितीचे उत्तमराव घोरपडे, नानासाहेब शेळके, साहेबराव जोंधळे, लक्ष्मणराव जोंधळे, विठ्ठल पानसरे , सरपंच सौ.आशाताई जोंधळे ,दूध संघाच्या संचालक सौ प्रतिभाताई जोंधळे, सोमनाथ जोंधळे, उपसरपंच अरुण जोंधळे, सुखदेव जोंधळे ,कारभारी साबळे, अनिल भुसाळ, माऊली डेंगळे, तानाजी जोंधळे आदींसह युवक कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी चिंचोली गुरव येथे पाणी परिषद घेऊन निळवंडे धरणासाठी प्रयत्न केले. विविध मंजूरी नंतर या कामाला सुरुवात झाली. मात्र 1999 नंतर कामाला खरी गती दिली असून सातत्याने परिश्रम करून धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली.कोरोना संकटातही कामे सुरू ठेवली . पुनर्वसनाचा प्रश्न सोडवला. संगमनेर व अकोले तालुक्यातील जमिनी त्या शेतकऱ्यांना दिल्या .अनेकांना संगमनेरच्या सहकारी संस्थांमध्ये नोकरी दिल्या. कालव्यांची कामे होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. काडीची ही मदत न करणारे आता मात्र मोठमोठी भाषणे ठोकतात. काडीची मदत न करता चांगल्या कामात काड्या घालण्याचे काम काहींनी केले. जनता त्यांना पूर्णपणे ओळखून आहे.
हे पाणी आणण्यासाठी कोणीतरी कष्ट घेतले आहे .याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे .हे पाणी दुष्काळी भागात आल्याने जीवनातील स्वप्न पूर्ण झाले. सर्वसामान्यांच्या समाधानाकरता राजकारण करायचे असते. मात्र ते सुडाचे राजकारण करत आहेत हे चांगले नाही. याचा जनता नक्की जाब विचारेल.दुष्काळी भागात अनेक गावांना पाणी मिळाले आहे .मात्र वरचा खालचा करू नका, सर्वांना पाणी मिळेल यासाठी प्रस्ताव तयार केला आहे.
सरकार आपले नाही. अडचणीचा काळ आहे .मात्र लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी जाईल यासाठीच आपला पाठपुरावा सुरू असून प्रत्येकाला पाणी मिळेल असे सांगताना सध्याचे सरकार हे हे शेतकऱ्यांवर घाव घालणारे आहे. कांद्याचे दर कोसळले आहे. दुधाचे बाजार 34 वरून 25 रुपये झाले आहे. अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कापूस वाया गेली आहे. द्राक्षाच्या बागा संपल्या आहेत. शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सरकार काहीही करत नाही. धर्माच्या नावावर राजकारण करून असे त्यांना वाटत आहे . मात्र महाराष्ट्रातील जनता त्यांना फासणार नाही असेही ते म्हणाले. यावेळी लक्ष्मण जोंधळे, विठ्ठलराव पानसरे यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश जोंधळे यांनी केले तर अरुण जोंधळे यांनी आभार मानले.
आमदार थोरात हेच खरे जलनायक – घोरपडे
निळवंडे धरण व कालव्यांसाठी रात्रंदिवस पाठपुरावा करून हे काम पूर्ण करणारे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात हीच खरे जलनायक आहेत .ज्यांनी कधी मदत केली नाही. कामात अडथळे निर्माण केले. कृती समितीच्या सदस्यांवर लाठी हल्ले केले. ते स्वतःला जलनायक म्हणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जनतेने त्यांचे ढोंग पूर्णपणे ओळखले असून कितीही प्रयत्न केले तरी खरे कोण आहे हे दुष्काळी जनता सांगत असल्याने ते अस्वस्थ असल्याची टीकाही उत्तमराव घोरपडे यांनी नाव न घेता मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर केली.