महायुती सरकार हे जनतेच्या मनातील सरकार – ना.राधाकृष्ण विखे पाटील
महायुती सरकार हे जनतेच्या मनातील सरकार – ना.राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर । प्रतिनिधी ।
महायुती सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बदं पाडण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करीत आहे. पण आमचे सरकार ही योजना बंद पडू देणार नाही. बहीणींचा हक्क आबाधित राहावा म्हणून या योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचाच आमचा प्रयत्न असेल असे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.मंत्री विखे पाटील यांनी महायुतीच्या प्रचारार्थ तालुक्यातील शिबलापूर, कनकापूर, ओझर बुद्रूक या गावांमध्ये पदयात्रा काढून मतदारांच्या भेटी घेतल्या. ठिकठिकाणी युवक आणि महिलांनी त्यांचे उस्फुर्तपणे स्वागत केले. जेष्ठ नागरीकांचे आशिर्वाद घेवून त्यांनी महायुती सरकारच्या योजनांचा लाभ मिळत असल्याची खात्री संवाद साधून करुन घेतली.
महायुती सरकार हे जनतेच्या मनातील सरकार असल्याने सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय या सरकारने घेतले. यापुर्वी राज्यात महाविकास आघाडी सरकार होते. पण त्यांनी निर्णय तर घेतले नाहीच, उलट सुरु असलेल्या योजनांच्या निर्णयांना स्थगिती देण्यातच धन्यता मानली. महायुती सरकारच्या योजना बंद करण्याची भाषा आघाडीच्या नेत्यांची आजही सुरु आहे. पण आपल्या सर्वांच्या पाठबळामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार असल्याने कोणतीही योजना बंद होणार नाही याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्ह्यात ११ लाख महीलांना योजनांचा लाभ मिळाला असून, संगमनेर तालुक्यात १ लाख ३३ हजार महीलांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे नमुद करुन, भविष्यात या योजनेच्या अनुदानात वाढ करण्याचाच सरकारचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतक-यांना एक रुपयात पीक विमा योजना सुरु करणारे आपले राज्य देशात एकमेव आहे. आता मोफत विजही देण्याचा निर्णय घेतला असून, भविष्यात सौर उर्जेचा उपयोग करुन, शेतक-यांना दिवसा विज देण्याचे धोरण सरकारचे आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दूध उत्पादक शेतक-यांना सात रुपयांच्या अनुदानाचा निर्णय झाल्याने या व्यवसायाला पाठबळ देण्याची भूमिका ही महायुती सरकारची होती. युवकांचे राजगाराचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली असून, आपल्या मतदार संघात आचार्य चाणक्य युवा कौशल्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. अशी योजना सुरु करणारा शिर्डी विधानसभा मतदार संघ हा एकमेव असून, २४ प्रशिक्षण केंद्रामधून युवक आणि युवतींना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. भविष्यात जिल्ह्यामध्ये येणा-या युवकांना या प्रशिक्षीत मनुष्यबळाचा निश्चित उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील गावांचा समावेश शिर्डी विधानसभा मतदार संघात झाल्याने या भागाच्या विकास प्रक्रीयेला गती मिळाली. गावांमध्ये आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांना आपण निधीही कमी पडू दिला नाही. भविष्यातही ही विकासाची प्रक्रीया अशीच निरंतर सुरु राहील असे त्यांनी आश्वासित केले.