महायुतीचे दहा आमदार निवडून आल्यामुळे जिल्हा हा महायुतीच्या पाठीशीच आहे हे सिध्द झाले – ना.राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डीच्या जनतेने दिलेल्या पाठबळामुळेच हा एैतिहासिक विजय होवू शकला. - ना.राधाकृष्ण विखे पाटील
महायुतीचे दहा आमदार निवडून आल्यामुळे जिल्हा हा महायुतीच्या पाठीशीच आहे हे सिध्द झाले – ना.राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डीच्या जनतेने दिलेल्या पाठबळामुळेच हा एैतिहासिक विजय होवू शकला. – ना.राधाकृष्ण विखे पाटील
लोणी । प्रतिनिधी ।
अहिल्यानगरची जनता ही महायुतीच्याच पाठीशी आहे हे विधानसभेच्या निकालाने सिध्द करुन दाखविले आहे. निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीकडून फक्त खोटे नॅरेटिव्ह पसरविण्याचे काम झाले. मात्र सुज्ञ जनतेने त्यांना थारा दिला नाही. जाणत्या राजांनीही या जिल्ह्यात खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही जनतेने घरात बसविले आहे. तर भावी म्हणून मिरवून घेणा-याना सुध्दा जनतेने आता माजी करुन टाकले असल्याचा टोला महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
विधानसभा निवडणूकीत एैतिहासिक मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल लोणी बुद्रूक ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात ना.विखे पाटील बोलत होते. तत्पूर्वी त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रवरानगर येथे जावून मंत्री विखे पाटील यांनी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
आपल्या सत्काराला उत्तर देताना मंत्री विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टिकास्त्र सोडले. केवळ दिशाभूल करणारी वक्तव्य करुन, राज्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम लोकसभा निवडणूकीत यांनी केले, परंतू विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारमध्ये कुठेही घटना बदलली नाही आणि आरक्षणही रद्द केले नाही, अशा खोट्या नॅरेटिव्हला जनतेने या विधानसभा निवडणूकीत कुठेही थारा दिला नाही त्यामुळेच, महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला एैतिहासिक असे पाठबळ देवून पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची संधी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीच्या योजनांना बदनाम करण्याचे काम तसेच समाजामध्ये जातीयवादा वरुन सामाजिक मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. या सर्वांनाच जनतेने मतदानातून चपराक दिली. या शिर्डी विधानसभा मतदार संघातही जाणते राजे आले. खोटे आरोप करुन, संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण शिर्डीच्या सुज्ञ जनतेने त्यांना कुठेही थारा दिला नाही, कारण वर्षानुवर्षे जिल्ह्यात एकमेकांमध्ये झुंजी लावण्याचे काम त्यांनी केले. कुटूंबा कुटूंबामध्ये भांडण लावली. या जिल्ह्याचा केवळ राजकारणासाठी वापर करुन घेतला. चार वेळा मुख्यमंत्री राहूनही निळवंडेचे काम यांना पुर्ण करता आले नाही. त्यांच्याही खोट्या भूलथापांना आता जनतेने टोलावले आहे. आता जिल्ह्यातच काय राज्यातही त्यांना फिरण्याची संधी राहीलेली नाही. त्यांनी आता घरात बसून आराम करावा.
राज्यात अनेक भावी मुख्यमंत्री तयार झाले होते, त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातीलही एक होते, पण या भावींना आता जनतेने माजी करुन टाकले आहे. दशहतीचा आरोप करुन शिर्डीच्या पवित्र भूमीला आणि जनतेला अपमानीत करण्याचे काम शेजारच्या नेत्यांनी केले. पण खरी दशहत कुठे होती हे उघड झाले. संगमनेरच्या दहशतीचे झाकण आता ख-याअर्थाने उडाले आहे. अमोल खताळ सारख्या सामान्य कार्यकर्त्याने यांची दहशत मोडून काढली असल्याचे सांगतानाच, पारनेरच्या बाबतीतही हेच घडले. केवळ विखे परिवाराची बदनामी करुन, राजकारण करु पाहणा-यांना आता या जिल्ह्याने चांगलाच धडा शिकविला आहे.
महायुतीचे दहा आमदार निवडून आल्यामुळे जिल्हा हा महायुतीच्या पाठीशीच आहे हे सिध्द झाले आहे. येणा-या काळात जी जी आश्वासनं महायुती सरकारच्या वतीने देण्यात आली आहेत. त्याची पुर्तता करतानाच शिर्डीची औद्योगिक वसाहत, निळवंडे चा-यांची कामे आणि युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्याचे काम पुढील एक वर्षात आपल्याला करायचे असून, शिर्डीच्या जनतेने दिलेल्या पाठबळामुळेच हा एैतिहासिक विजय होवू शकला. लाडक्या बहीणींचे पाठबळी उभे राहील्याचे समाधान ना.विखे पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी माजी आ.आण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ.सुजय विखे पाटील यांचीही भाषण झाली.