स्वतंत्र समता आणि बंधुता हा मंत्र देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी म्हत्वाचा ठरला – प्रा.डॉ.राजेंद्र सलालकर
स्वतंत्र समता आणि बंधुता हा मंत्र देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी म्हत्वाचा ठरला – प्रा.डॉ.राजेंद्र सलालकर
लोणी । प्रतिनिधी ।
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेला संविधान ग्रंथ जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते. स्वातंत्र्य, समता आणि बंधूता असा संविधानाने दिलेला मंत्र देशाला पुढे घेवून जाण्यासाठी उपयुक्त ठरला असल्याचे प्रतिपादन साहित्यिक प्रा.डॉ.राजेंद्र सलालकर यांनी केले.भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान अभिवादन कार्यक्रम डॉ.विखे पाटील कारखान्यावर संपन्न झाला. यानिमित्ताने भारतरत्न डॉ.बबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहीक वाचन झाले. कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, व्हा.चेअरमन सतिष ससाणे, यांच्यासह सर्व संचालक, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. २६/११ च्या हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या आधिकारी आणि जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
आपल्या भाषणात डॉ.सलालकर म्हणाले की, सर्व जाती, धर्म, भाषा, प्रांत यांना समान न्याय तत्वाने हक्क, अधिकार मिळवून दिल्यामुळेच संविधानाप्रती सर्वांना आदर वाटतो. आज ७५ वर्षाच्या यशस्वी वाटचालीत देशातील सामान्य माणूस संविधानातील अधिकारा नूसार स्वत:ला सिध्द करू शकला. या देशाची लोकशाही भक्कमपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे यांनी आपल्या भाषणात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाचा सर्वांना आदर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशात संविधान दिन सुरू झाला, त्यामुळे संविधानामध्ये बदल करण्याच्या चर्चा या खुप निरर्थक ठरतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन मधील निवासस्थानाचा विकास झाला. इंदुमिल येथील स्मारकाच्या कामालाही गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवरा उद्योग समुहातील सर्वच संस्थामध्ये संविधान दिनाचे कार्यक्रम संपन्न झाले. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक यांच्या उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहीक वाचन करण्यात आले.