जलसंधारण कामांमुळे खडकेवाके वृक्ष संपदेने बहरले
जलसंधारण कामांमुळे खडकेवाके वृक्ष संपदेने बहरले
शिर्डी । विनोद जवरे ।
राहाता तालुक्यातील खडकेवाके गावात कृषी विभाग, जिल्हा परिषद पाटबंधारे विभाग व लोकसहभागाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झाल्याने गावातील पाण्याच्या स्रोतात वाढ झाली असून गावातील परिसर नैसर्गिक वृक्ष संपदेने बहरून गेला आहे.राहाता तालुक्यातील जिरायत भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खडकेवाके या सुमारे तीन हजार लोकवस्तीच्या गावात शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून १०० हेक्टर क्षेत्रावर बांध बंधिस्तचे कामे करण्यात आली आहेत. जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून गावातून वाहणाऱ्या कात नदीवर ३५ लाख रूपये खर्च करून ७ बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. यामुळे गावातील शेतीक्षेत्रात असलेल्या विहीरींच्या पाणी पातळीत वाढ झाली.
कात नदीवर असलेल्या जून्या साठवण तलावातील गाळ काढण्यासाठी लोकसहभागातून तलाव खोलीकरण मोहीम राबविण्यात आली. यामुळे आज गावालगत असलेल्या तलावात सुमारे २५ लाख लीटर पाण्याची साठवण झाली आहे.खडकेवाके गावात पाच वर्षापूर्वी पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ही पायपीट करावी लागत होती, आज जलसंधारणाच्या झालेल्या कामांमुळे गावातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून बंद पडलेल्या हातपंपांना पाणी आले आहे. नागरिकांना पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. एकेकाळी शेतात फक्त खरीप पीके घेतली जात होती आज गावात रब्बी व नगदी पीके घेतली जात असून ऊस, सोयाबीन पीक क्षेत्रात वाढ झाली आहे.
गावातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने गावकऱ्यांना वृक्षांचे रोपण व संवर्धन करण्यास बळ मिळाले, यामुळे आज गावातील परिसर सुमारे सहा हजार वृक्षांनी बहरून गेला आहे. गावातील सर्व रस्त्यांना वृक्षारोपण करण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभाग तसेच बिहार पॅटर्न अंतर्गत व इतर प्रासंगिक कार्यक्रमानिमित्त गावात वृक्षारोपण केले जाते. निसर्ग संवर्धनाचा नवा वस्तूपाठच खडकेवाके गावाने घालून दिला आहे.
शासकीय पातळीवर मिळालेले सहकार्य व लोकसहभागात खडकेवाके गावात जलसमृद्धी अवतरली आहे. यामुळे निश्चितच गावाच्या विकासाला पाठबळ मिळाले असून शेती पीक उत्पादनात वाढ झाली आहे. गाव टँकर मुक्त झाले आहे.
सचिन मुरादे, खडकेवाके
———————————
जिरायत भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खडकेवाके गावाची ओळख आता बदलली असून गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे बारमाही मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. शेतकरी आता नगदी पीके घेऊन लागली आहेत.
जालिंदर मुरादे, खडकेवाके ग्रामस्थ