वाचन व लेखन प्रत्येकासाठी गरजेचेच – मा आ डॉ तांबे
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात लेखन व पुस्तक प्रकाशन कार्यशाळा संपन्न
वाचन व लेखन प्रत्येकासाठी गरजेचेच – मा आ डॉ तांबे

संगमनेर ( प्रतिनिधी)–सध्याच्या यांत्रिक व सोशल मीडियाच्या युगात वाचन कमी झाले आहे. मात्र वाचनानेच माणूस समृद्ध होत असून चांगल्या व्यक्तिमत्त्वासाठी वाचन व लेखन हे अत्यंत गरजेचे असून यासाठीच्या होणाऱ्या कार्यशाळा या अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी काढले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भाषा विभाग व सकाळ प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लेखन व पुस्तक प्रकाशन कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर वरिष्ठ व्यवस्थापक अमृता देसरडा, इतिहासकार सुमित डेंगळे, सचिव दत्तात्रय चासकर ,रजिस्टर बाबुराव गवांदे ,प्रा. विठ्ठल शेवाळे ,संदीप वाकचौरे, प्रमोद देशमुख प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ.तांबे म्हणाले की, माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाचन चळवळ समृद्ध होण्याकरता सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असून पुस्तकांमुळेच क्रांती होते. चांगल्या व्यक्तिमत्त्वासाठी वाचन हे अत्यंत गरजेचे आहे वाचाल तर वाचाल ही उक्ती खरी आहे. सोशल मीडियाच्या काळात वाचन होत नसल्याने अपुऱ्या माहितीने संभ्रम निर्माण केला जात आहे. समृद्ध पिढी घडवण्यासाठी पुस्तके अत्यंत गरजेचे असून प्रत्येकाने वाचन, लेखन आणि चिंतन केलेच पाहिजे.

तर अमृता देसरडा म्हणाले की लेखनातून समाज घडत असतो. लिखाणांमधूनच नवी ऊर्जा मिळते इतिहासाबद्दल माहिती मिळते. याचबरोबर ही माहिती संकलन करून पुस्तके होणे अत्यंत गरजेचे आहे प्रकाशन हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असून यामधून अनेकांना रोजगाराच्या संधी सुद्धा निर्माण होत असल्याचे ते म्हणाले तर सुमित डेंगळे म्हणाले की सध्या वाचन संस्कृती लोपपावत चालली आहे. तरीही सोशल मीडियाच्या काळात प्रिंट मीडियाचे महत्त्व अजून टिकून आहे. लेखणीसाठी नवीनता कल्पकता व सृजनशीलता महत्त्वाची असून ती विकसित करण्यासाठी अशा कार्यशाळांची गरज आहे.यावेळी विविध विषयांवरील लेखन करणे आणि याबाबतची संकलित माहिती पुस्तक प्रकाशनासाठी तयार करणे याविषयीचे प्रशिक्षण देण्यात आले .यामध्ये अनेक विद्यार्थी व साहित्यिकांसह संगमनेर मधील वाचन व पुस्तक प्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब वाघ यांनी केले सूत्रसंचालन समन्वयक डॉ लक्ष्मण घायवट यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वी चे साठी सर्व विभाग प्रमुख शिक्षक विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.