केंद्र आणि राज्य सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – मंत्री शिवराजसिंह चौहान
सलग आठवेळा त्यांना येथील जनता निवडून देण्याचे कारण कोणती लाट नाही तर, जनतेने त्यांच्यावर मनापासून केलेले प्रेम
केंद्र आणि राज्य सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – मंत्री शिवराजसिंह चौहान
सलग आठवेळा त्यांना येथील जनता निवडून देण्याचे कारण कोणती लाट नाही तर, जनतेने त्यांच्यावर मनापासून केलेले प्रेम
लोणी । प्रतिनिधी ।
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ शेतक-यांना सहजपणे मिळावा म्हणून यासाठी सॅटेलाईट रिमोट सेंन्सेसिंगचा उपयोग करुन, फोटोव्दारे नुकसान भरपाई मिळण्याची तरतुद योजनेमध्ये केंद्र सरकारने केली असून, यासाठी ८५२ कोटी रुपयांची तरतुद केली असल्याची माहीती केंद्रीय कृषि व ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिली. राज्यातील लाडक्या बहीणींना आता लखपती दिदि बनविण्याचे काम ‘मामा’ करीतच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बाभळेश्वर येथील कृषि विज्ञान केंद्रात शेतकरी आणि बचत गटातील महिलांशी संवाद साधला. प्रारंभी बचत गटांच्या स्टॉलला त्यांनी भेट देवून पाहाणी केली. राज्य सरकारच्या कृषि योजनेतून मंजुर झालेल्या टॅक्टरचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील लखपती दिदि तसेच यशवंत शेतक-यांचा सन्मान केंद्रीय कृषि मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांतकुमार पाटील, आयसीएआरचे विभागीय संचालक एस.के रॉल, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रंजनकुमार सिंगर, चेअरमन कैलास तांबे, डॉ.भास्करराव खर्डे, नंदु राठी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनौन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी आधिकारी योगेश सागर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग आदि याप्रसंगी उपस्थित होते.
शेतक-यांमध्येच आम्ही देव पाहतो, अशा भावनिकतेने आपल्या भाषणाची सुरुवात करुन, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, नव्या वर्षात केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेला अधिक बळकटी देण्याचा निर्णय घेतला असून, या योजनेपासून शेतकरी वंचित राहू नये म्हणून आता योजनेच्या सहाय्यतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. कंपन्यांकडून होणारी गडबड तसेच विमा कंपन्यांकडे केल्या जाणा-या दाव्यांमध्ये सुलभता यावी म्हणून, सॅटेलाईट रिमोट सेन्सिंगव्दारे नुकसान झालेल्या गावांचा पुरावा ग्राह्य धरला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र आणि राज्य सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी अनेक योजनांची सुरुवात केली आहे. लागवडीचा खर्च कमी व्हावा आणि शेतक-यांना चांगल्या पिकांव्दारे मोबदलाही मिळावा हीच आमची रणनिती आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना आणि किसान सन्मान योजना सुरु करण्यात आली असून, राज्य सरकारनेही सहा हजार रुपयांची योजना सुरु करुन, शेतक-यांना दिलासा दिल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. चार सुत्रांवर केंद्र सरकार शेतक-यांसाठी काम करीत असून, पिकाला हमीभाव, विमा योजना आणि पारंपारिक शेती बरोबरच आधुनिक शेतीलाही केंद्र सरकारने प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
मध्यप्रदेश सरकारने सुरु केलेली लाडली बहेन योजना महाराष्ट्रातील युती सरकारने सुरु केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतानाच लाडक्या बहीणीच या भावांची जाणीव ठेवू शकतात. परंतू आता आपल्याला येथेच थांबायचे नाही तर, लाडक्या बहीणींना आम्हाला लखपती दिदि बनवायचे आहे. त्यांच्यामध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करुन त्यांना स्वाभिमानी बनवायचे आहे. यासाठी प्रधानमंत्र्यांनी ३ कोटी लखपती दिदि बनविण्याचे उदिष्ठ ठेवले असून, आत्तापर्यंत १ कोटी १५ लाख लखपती दिदि बनल्या असल्याचे चौहान यांनी सांगितले.मध्यप्रदेश सरकारने आता संपत्तीवर महिलांचे नाव लावण्याचा निर्णय केल्यामुळे लाडक्या बहिणींना त्यांचा आधिकार मिळत आहे. आता आमची लाडकी बहीण गरीब राहणार नाही. केंद्र सरकारच्या घरकुल योजनेसाठीही राज्याला मोठी मदत केली जाणार असून, आत्तापर्यत १३ लाख घरे मंजुर केली असून, येणा-या काळात ही घरकुलांची संख्या वाढणार आहे. या योजनेचे निकषही आता बदलण्यात आले असून, पाच एकर कोरवडवाहू आणि अडीच एकर बागायती जमीन असलेल्या शेतक-यांनाही या घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवराजसिंह चौहान यांच्या कार्याचा गौरव करुन समर्पित भावनेने काम करणा-या नेतृत्वाकडे देशाचे कृषि खाते आल्याने शेतक-यांच्या अपेक्षा अधिकच उंचावल्या आहेत. मध्यप्रदेशमध्ये त्यांनी धान्य गोदामाची निर्माण केलेली साखळी हे देशामध्ये एक उदाहरण ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या लाडक्या बहीण योजनेचा पॅटर्न महाराष्ट्राने स्विकारला असून त्याचे चांगले परिणाम दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.उत्तमराव कदम यांनी केले.
लोकनेते स्व.बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठवणींना उजाळा देताना मंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, संसदेतील एक मित्रत्वाचे नाते त्यांच्याशी जोडले गेले होते. तोच वारसा कायम ठेवून राधाकृष्ण विखे पाटील आता काम करीत आहेत. सलग आठवेळा त्यांना येथील जनता निवडून देण्याचे कारण कोणती लाट नाही तर, जनतेने त्यांच्यावर मनापासून केलेले प्रेम असल्याचे त्यांनी सांगितले. आता त्यांच्याकडे जलसंपदा खाते आहे. आता केंद्राची आणि त्यांची जवळीक अधिक वाढेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.