प्रवरेतून मुलींना आत्मविश्वास मिळतो – सौ.वैशाली कोतकर- माने
प्रवरेतून मुलींना आत्मविश्वास मिळतो – सौ.वैशाली कोतकर- माने
प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
लोणी । प्रतिनिधी । प्रवरेचा आदर्श घेऊनच मी शैक्षणिक संकुल सुरु करु शकले, प्रवरेने दिलेल्या संस्कारामुळेच मी घडू शकले. या ठिकाणी बघितलेले चढउतार आणि मिळालेले शिक्षण यातून पुढे जातांना मीही शिक्षण क्षेत्रात यशस्वी होण्याचा आत्मविश्वास मिळाला असल्याचे प्रतिपादन भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका सौ.वैशाली कोतकर-माने यांनी केले.

लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या ४९ व्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालीनीताई विखे पाटील, सौ.अनिता घोगरे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुष्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, माजी सिनेट सदस्य अनिल विखे, प्राचार्या सौ.रेखा रत्नपारखी, प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या प्राचार्या सौ.भारती कुमकर, प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ.बी.बी.अंबाडे आदींसह पालक, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विद्यार्थीनींनी मार्गदर्शन करताना वैशाली सौ.कोतकर-माने म्हणाल्या की, प्रवरेत मिळालेल्या संस्कारामुळे मला जिवणात यशस्वी होता आले. येथील शिस्त, मिळणारे प्रोत्साहन, प्रेरणा त्याचबरोबर नेतृत्वगुण यामुळे मीही संस्था उभे करू शकते हा आत्मविश्वास मला प्रवरेतून मिळाला.विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच विविध कला अवगत कराव्यात, कष्ट करा, आपले ध्येय साध्य करा, आव्हानांना सामोरे जा यातूनच आपण सक्षम विद्यार्थी होणार असून जीवनातील चढ-उतारातूनच यशस्वी व्हा असे आवाहन करतांनाच माजी विद्यार्थी हे संस्थेला काहीतरी देणं लागतात. या माध्यमातून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेले शंभर पुस्तके शाळेत भेट देत आदर्श विद्यार्थी घडावेत हाच आपला उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुष्मिता विखे पाटील यांनी प्रवरेचा माध्यमातून सक्षम विद्यार्थी घडवत असताना जलसंपदा मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवरेतील विद्यार्थी हा नोकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा ठरावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून विद्यार्थीनींसाठी प्रवरेचा कॅम्पस हा सुरक्षित असल्यामुळे राज्यभरातून विद्यार्थ्यांची मोठी संख्या या भागात असून, शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने येथील विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान देऊन एक सक्षम विद्यार्थी प्रवराच्या माध्यमातून घडावा यासाठी विविध उपक्रम हे सुरू केले आहेत.संस्थेने सुरु केलेल्या उपक्रमांमध्ये
पालकांचाही सहभाग वाढत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विविध उपक्रमातून सक्षम विद्यार्थी हाच आपला ध्यास असल्याचे सांगून येणाऱ्या काळात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची , तयारी करण्यासाठी व सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रारंभी प्राचार्या सौ.रेखा रत्नपारखी यांनी वार्षिक अहवाल वाचन करत शाळेच्या शैक्षणिक आणि विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती देण्याबरोबरच क्रीडा क्षेत्राचा आढावा घेतला.
सांस्कृतिक कार्यक्रम हा पालकांसह सर्वांसाठीच मेजवानी ठरला. या माध्यमातून उत्तर भारतातील विविध कला, संस्कृती, परंपरा, आहार,पोषाख आणि सण उत्सवाची माहिती देणारा ठरला. कार्यक्रमाच्या निमित्ताने गुणवंत आणि विविध क्षेत्रात नेत्र दीपक कामगिरी केलेल्या विद्यार्थ्याचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.