भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश आधिवेशनाची जय्यद तयारी – मंत्री विखे पाटील
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश आधिवेशनाची जय्यद तयारी – मंत्री विखे पाटील
विधानसभा निवडणूकी नंतर शिर्डीमध्ये आधिवेशन घेण्याची संधी पक्षाने आम्हाला दिली, याबद्दल मोठा आनंद – मंत्री विखे पाटील
शिर्डी । प्रतिनिधी ।
श्रध्दा सबुरी, भाजपाची महाभरारी हे ब्रिद घेवून भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश आधिवेशनाची जय्यद तयारी साईनगरीत करण्यात आली असून, संपूर्ण शिर्डी शहर भाजपमय झाले आहे. पक्षाचे संघटनात्मक पदाधिका-यांसह महत्वपूर्ण नेते शिर्डीत दाखल झाले असून, आधिवेशनाची नियोजनबध्द तयारी जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.
शिर्डीमध्ये पक्षाचे प्रदेश आधिवेशन प्रथमच होत असून, यंदाच्या आधिवेशनाला राज्यातील विधानसभा निवडणूकीतील महाविजयाची पार्श्वभूमी आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये पुन्हा घवघवीत यश मिळविण्याचा निर्धार या आधिवेशनात करण्यात येणार असून, यासाठी पक्षाने श्रध्दा सबुरी, भाजपाची महाभरारी हा संदेश या आधिवेशनाच्या निमित्ताने दिला आहे.
आधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील भाजपाचे सर्व मंत्री शिर्डीमध्ये दाखल झाले असून, केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांचे रविवारी दुपारी शिर्डीत आगमन होणार आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आधिवेशनाचा समारोप होणार असून, अगामी सर्व निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह राज्यातील पक्षनेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांना कोणता संदेश देतात याची उत्सुकता राजकीय क्षेत्राला आहे.आधिवेशना करीता राज्यातून वीस हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील अशी शक्यता गृहीत धरुन भव्य सभामंडपाची उभारणी प्रसादालया शेजारील पटांगणावर करण्यात आली आहे. या मंडपात केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, आमदार, खासदारांची स्वतंत्र आसण व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित सभा मंडपात राज्यभरातून येणारे सर्व प्रतिनिधी बसू शकतील अशी व्यवस्था करणत आली आहे. शेजारीच असलेल्या मंडपामध्ये व्हीआयपी भोजन कक्षासह सुमारे २० हजार प्रतिनिधींच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
संपूर्ण शहरामध्ये भाजपाच्या स्वागताच्या कमानी, पक्षाचे झेंडे लावण्यात आले असून, संपूर्ण साईनगरी भाजपमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी ९.३० वा. आधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. दिवसभरामध्ये काही राजकीय ठराव या आधिवेशनात संमत करण्यात येणार असून सांयकाळी आधिवेशनाचा समारोप केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थित होणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ.सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या आधिवेशनाची तयारी पुर्ण झाली असून, मागील दोन दिवस मंत्री विखे पाटील यांनी सर्व तयारीचा आढावा घेतला. आजही त्यांनी आधिवेशन स्थळी येवून सर्व तयारीची पाहाणी केली. आवश्यक त्या सुचना विविध विभागातील आधिका-यांना त्यांनी दिल्या आहेत.माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणूकी नंतर शिर्डीमध्ये आधिवेशन घेण्याची संधी पक्षाने आम्हाला दिली, याबद्दल मोठा आनंद असून, सर्वांच्या स्वागतासाठी साईनगर सज्ज झाली आहे. विधानसभा निवडणूकीत मिळालेला महाविजय आणि अगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत पक्षाला पुन्हा प्रथम क्रमांकाने विजयी करण्याचा निर्धार या आधिवेशनात होईल. हे आधिवेशन पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी नवा आत्मविश्वास देणारा ठरेल असेही ना.विखे पाटील म्हणाले.