चांगल्या संवादातून निर्माण होणारे नाते मुलांच्या यशस्वी आयुष्याला दिशा देणारे ठरेल – मानस शास्त्राच्या तज्ञ सौ तृप्ती कुलश्रेष्ठ
चांगल्या संवादातून निर्माण होणारे नाते मुलांच्या यशस्वी आयुष्याला दिशा देणारे ठरेल – मानस शास्त्राच्या तज्ञ सौ तृप्ती कुलश्रेष्ठ
चांगल्या संवादातून निर्माण होणारे नाते मुलांच्या यशस्वी आयुष्याला दिशा देणारे ठरेल – मानस शास्त्राच्या तज्ञ सौ तृप्ती कुलश्रेष्ठ
लोणी । प्रतिनिधी ।
पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे लादण्यापेक्षा त्यांच्यातील चांगल्या गुणांचे कौतूक करणे खुप महत्वाचे आहे. निर्णय लादण्यापेक्षा त्यांच्यातील सुप्त गुणांनाही थोडी संधी द्या. चांगल्या संवादातून निर्माण होणारे नाते मुलांच्या यशस्वी आयुष्याला दिशा देणारे ठरेल असा महत्वपूर्ण सल्ला मानस शास्त्राच्या तज्ञ सौ तृप्ती कुलश्रेष्ठ यांनी पालकांना दिला.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेच्या २४ व्या वर्षाचे दुसरे पुष्प “समंजस पालकत्व- एक आवाहन” या विषयावर सौ.कुलश्रेष्ठ यांनी गुंफले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या या व्याख्यानास प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुष्मिता विखे संचालिका सौ.संचालिका लिलावती सरोदे, सौ अलका दिघे, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ.प्रदीप दिघे, डॉ.हरिभाऊ आहेर डॉ.महेश खर्डे, डॉ.आर.ए.पवार आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक,पालक उपस्थित होते.
यावेळी पालकांशी संवाद साधताना सौ.कुलश्रेष्ठ म्हणाल्या की, लहानपणी आपण ज्याप्रमाणे आपल्या मुलांबरोबर वागतो त्याच प्रमाणे मुले मोठी झाल्यावर त्यांच्या मुलांबरोबर वागतात, त्यामुळे आय एम ओके. यु आर ओके हे प्रत्येक पालकांनी लक्षात ठेवले पाहीजे. मुलांवर आपली स्वप्न लादू नका. आपल्या मुलांची तुलना इतर मुलांबरोबर करू नका. मुलांना पैशाची किंमत राहिलेली नाही हे सत्य असले तरी त्यांना हे पैसे कसे येतात याची जाणीव त्यांना करून देण्याची गरज आहे.पालक आणि मुलांमधील संवाद कमी झाला आहे, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये मुलामध्ये आणि पालक यांच्यामध्ये संघर्ष वाढणे हा सामाजिकदृष्ट्या धोक्याचा इशारा असून, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.मुलांना काय करायचे यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या, आज इतर मुलं जे करतात तेच आपल्या मुलांनी केले पाहिजे हा हाट्ट पालकांनी सोडला पाहिजे. आपल्या मुलांबरोबर आपण संवादाच्या माध्यमातून बोलले पाहिजे. आपल्या प्रमाणेच मुलांना पण ताण-तणाव असतात. हे समजून घेतले पाहिजे. मुलांच्या ताण-तणावांला कमी लेखू नका असे सांगतानाच त्यांना पाठबळ देण्याचे काम प्रत्येक पालकांना केले पाहिजे.प्रत्येक मुलाचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्व असते. आपली बाजू मुलांना व्यवस्थितरित्या समजून सांगण्याची गरज आहे. आजच्या मुलांकडून आई-वडिलांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुलांना आपण नेहमीच ताण-तणावांमध्ये ठेवत असतो त्यांचे ताण-तणाव कमी करण्याच्या दृष्टीने पूर्वी एकत्रित कुटुंबामध्ये संवाद होत होता परंतु आज प्रत्येक घरामध्ये मुलांचा आणि आई-वडिलांचा संवाद कमी झाल्याची खंत व्यक्त करतानाच हा संवाद वाढण्याची गरज आहे.
पूर्वीपेक्षा आजची शिक्षण पद्धती व्यापक आणि तितकीच आव्हानात्मक आहे. या आव्हानांना सामोरे जोण्यासाठी कुटूंबात सकारात्मक दृष्टीकोन असला पाहीजे. प्रत्येकाचा मेंदू हा त्याच्या वर्तनाला प्रभावित करत असतो १८ वर्षापर्यंत मुले ही वादच घालत असतात परंतु त्यांना समजून घेण्याची गरज प्रत्येक पालकाची आहे.प्रौढ पिढीने मुलांना काय द्यायचे ते ठरवणे गरजेचे आहे, आपण आपल्या सवयी बदलल्या की मुलंही त्याचे अनुकरण करतात आपण जर घरामध्ये चिडचिड करत वागलो तर मुलंही त्याचे अनुकरण करतात. त्यामुळे मुलांसमोर रोल मॉडेल ठेवले पाहीजे. मुलांवर विश्वास ठेवा, त्यांची एकमेकांसोबत तुलना करू नका त्यांच्या मित्रांबरोबर बोला, त्यांना समजून सांगताना त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव करून द्या आणि जर आपण असे केले तरच आपण आदर्श पालक होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.प्रारंभी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवी ज्ञान हे महत्त्वाचे असते त्या दृष्टीने पालकांनी आपले अनुभव लक्षात घेऊन आपल्या मुलांवर संस्कार करण्याची गरज त्यांनी शेवटी व्यक्त केली.व्याख्यानमालेमध्ये तिसरे पुष्प हे मंगळवार दि.२१ जानेवारी २०२५ रोजी स्पर्धा परीक्षा आणि आजचा युवक या विषयावर इंद्रजीत देशमुख यांचे व्याख्यान होणार आहे.