खा.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते थोरात कारखान्याचे जगन्नाथ घुगरकर यांना उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार प्रदान
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये थोरात कारखान्याचा गौरव

खा.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते थोरात कारखान्याचे जगन्नाथ घुगरकर यांना उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार प्रदान
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये थोरात कारखान्याचा गौरव

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथे वार्षिक सर्वसाधारण सभेत 2023 24 चे विविध पुरस्कार खासदार पवार यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे खासदार विशाल पाटील ,मंत्री शिवेंद्रराजे भोसले, विवेक कोल्हे, नरेंद्र घुले, जयप्रकाश दांडेगावकर, थोरात कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, आदीसह राज्यभरातील मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी 2023 24 चा उत्कृष्ट कार्यकारी संचालक हा पुरस्कार जगन्नाथ घुगरकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला स्मृतीचिन्ह 1 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने मागील दोन वर्ष 10 लाख मे. टना पेक्षा जास्त गाळप करताना उच्चांकी भाव दिला आहे. याचबरोबर वीज निर्मिती आणि इंडस्ट्रियल अल्कोहोल उत्पादनासह शेतीसाठी आवश्यक खते व विविध उपपदार्थांची निर्मिती केली आहे. व्यवस्थापन सभासद संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी या सर्वांना सोबत घेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जगन्नाथ घुगरकर यांनी शिस्तबद्धपणे काम करताना राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार मिळवले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण कामाची दखल घेऊन त्यांना हा दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाला आहे.याप्रसंगी ज्येष्ठ नेते खासदार पवार म्हणाले की ,सहकार चळवळ ही महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाचा पाया असून यामध्ये सहकारी साखर कारखान्याची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे .प्रत्येक कारखान्याने आपला वेगळा ठसा उमटवला असून यापुढील काळातही सहकार टिकवण्याची जबाबदारी सर्वांवर असणार आहे. संगमनेर परिसरामध्ये स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांनी वाढवलेली सहकार चळवळ ही देशासाठी दिशादर्शक ठरली असल्याचे ते म्हणाले.तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कारखाने चालवताना अनेक अडचणी येत असतात परंतु यावर मात करून हा सहकार टिकवावा लागणार आहे. सरकार आणि कारखानदारीचे जवळचे नाते असून भविष्यात साखरेचे दर वाढणार आहे. प्रत्येक कारखान्यामध्ये आर्थिक शिस्त महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील ,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीही आपली मनोगती व्यक्त केली.या कार्यक्रमासाठी कारखान्याचे सेक्रेटरी किरण कानवडे, नवनाथ गडाख, रामदास तांबडे ,अशोक मुटकुळे ,संजय पाटील, केशव जगताप, भाऊसाहेब खर्डे , सरोदे, शिंदे,खबाले आणि कारखान्याचे विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
पुरस्काराची 1 लाख रुपये रक्कम भगवानबाबा गडाच्या विकासासाठी देणार- घुगरकरमिळालेल्या पुरस्कार हा कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सर्वांच्या परिश्रमाचा आहे. याचे श्रेय सर्वांना असून वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटने हा वैयक्तिक पुरस्कार 10000 ऐवजी 1 लाख रुपये हा केला असून या पुरस्काराची रक्कम आपण भगवान बाबा गडाच्या विकासाकरता देणार असल्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व त्यांच्या कुटुंबीयांनी यावेळी सांगितले.