जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चणेगांव येथे मातृ-पितृ व गुरु पुजनाचा सोहळा संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चणेगांव येथे मातृ-पितृ व गुरु पुजनाचा सोहळा संपन्न
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चणेगांव येथे मातृ-पितृ व गुरु पुजनाचा सोहळा संपन्न
लोणी । प्रतिनिधी ।
चणेगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच मातृ-पितृ व गुरु पुजनाचा सोहळा मोठ्या थाटात पार पाडला. शाळेतील विद्यार्थ्यांनी पाश्चिमात्य संस्कृतिला फाटा देत आई-वडिलांच्या व गुरुजनांच्या प्रति आपल्या मनातील असलेला आदरभाव व्यक्त करण्यासाठी मातृ-पितृ व गुरुपुजन करुन कृतज्ञता व्यक्त केली. सदर कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात माता पालक संघाच्या प्रतिनीधीची उपस्थिती लक्षणीय होती. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पलता सुलाखे यांनी आलेल्या अतिथींचे स्वागत करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. हिंदु धर्मामध्ये मातृ-पितृ आणि गुरु पुजनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजले पाहिजे हा मुख्य उद्देश या कार्यक्रमाच्या माध्यमातुन शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केलेले आहे. आई वडिल हे आपल्या जीवनातील पहिले गुरु असुन त्यांच्याकडुनच आपण कळत न कळत शिक्षणरुपी अमृत प्राशन करतो. त्यानंतर आपल्या अमुर्त अशा मुर्तीला सुबक आकार देण्याचे कार्य शिक्षकांकडुन घडते. यासाठी शालेय स्तरावर पाठ्यपुस्तकां व्यतिरिक्त विद्यार्थांच्या जडणघडणीत यासारखे उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. विद्या विनयन शोभते या उक्तीप्रमाणे ज्ञानाने मनुष्य स्वयंपुर्ण होतो. तद्वत त्याला आई वडिल व गुरुजनांचे आशिर्वाद सोबत असेल तर त्याचे जीवन सफल होते. याकरिता प्राथिमिक स्तरावरुन विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनांबद्दल आदरभाव तयार झाल्यास भविष्यकाळात सुसंस्काराचे अमृत निश्चितच दिशादर्शक व प्रेरणादायी ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात नकळत भारतीय संस्कृतीच्या विचारधारा व लोककला लोप पावत चाललेल्या आहेत. स्पर्धेच्या युगात माहिती तंत्रज्ञानाचे स्थान अमुलाग्र आहे तथापी भारतीय रितीरिवाज व उत्सव देखील नव्या पीढीला अवगत व्हावेत यासाठी शालेय स्तरावर अवांतर उपक्रमांतुन विद्यार्थाकडुन त्याचे संवर्धन होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.सदर कार्यक्रमासाठी श्री.शिवदास वर्षे हे प्रमुख पाहुणे लाभले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पलता सुलाखे, श्री. राजेंद्र जोशी, श्री.वाळीबा वाळेकर यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमासाठी श्री रामेश्वर विद्यालयाचे मख्याध्यापक डॉ. अनिल लोखंडे, श्री.एच.टी. कानगुडे, श्री.बी.ए.कांबळे, सौ.डि.डि. वाळेकर हे उपस्थितीत होते. सोहळा संपन्न झालेनंतर स्नहेभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.