विद्यार्थी हितासाठी महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि प्राध्यापक वर्ग नेहमीच प्रयत्नशील आहेत – गवांदे
लोकनेते थोरात महाविद्यालयात बक्षीस वितरण

विद्यार्थी हितासाठी महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि प्राध्यापक वर्ग नेहमीच प्रयत्नशील आहेत – गवांदे
विद्यार्थी हितासाठी महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि प्राध्यापक वर्ग नेहमीच प्रयत्नशील आहेत – गवांदे
लोकनेते थोरात महाविद्यालयात बक्षीस वितरण
संगमनेर । प्रतिनिधी ।
आयुष्याला दिशा देण्यासाठी एक लक्ष असावे लागते. ध्येय, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी शिवाय यशप्राप्ती अशक्य आहे. शिक्षण म्हणजे केवळ ज्ञानसंचय करणे नव्हे, तर संस्कारासह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनी करीअरसाठी व्यवहारिक ज्ञानावर भर द्यावा, असे प्रतिपादन सह्याद्री शिक्षण संस्थेचे रजिस्ट्रार बी. आर. गवांदे यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील लोकनेते बाळासाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विविध कलागुणदर्शन कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. गवांदे बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. पवार होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. रामदास आहेर, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. मच्छिंद्र नेहे, डॉ. राजेंद्र गायकवाड, प्रा. कविता कोटकर, डॉ. बाळासाहेब लावरे, प्रा. संतोष गुंजाळ, प्रा. ऋषिकेश सोळसे, प्रा. अभिजीत वाघ, प्रा. निलम काळे, प्रा. निलम आहेर, प्रा. शिल्पा खालकर, मच्छिंद्र दिघे, अशोक कांदळकर उपस्थित होते.
श्री. गवांदे म्हणाले, विद्यार्थीदशेत आपल्या भविष्याचे स्पष्ट चित्र मनात रेखाटणे व अतिशय बारकाईने ते कागदावर उतरविणे आवश्यक असते. प्रयत्नात सातत्य असेल तर सर्व शक्य आहे. विद्यार्थी हितासाठी महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि प्राध्यापक वर्ग नेहमीच प्रयत्नशील आहेत. अभ्यासासह इतर उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती रुजविण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जातात. मनोरंजनासह विद्यार्थ्यांना स्पर्धांची आवड लागावी आणि त्याच्यात सभा धीटपणा वाढावा यासाठी नित्य नियमाने स्पर्धा आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांनी व्यवहारिक ज्ञानावर भर द्यावा. हे सर्व गुण आत्मसात केले तर बौद्धिकदृष्ट्या सुदृढ, नैतिकदृष्ट्या सरळ आणि सामाजिक दृष्ट्या सहज विद्यार्थी निर्माण होईल. यासाठी पहिला शोध आपला घ्यायचा. प्रथम मी कोण आहे हे कळलं तर यशस्वी व्हायला अवघड नाही. कारण विद्यार्थी हा रचना करणारा असतो. ज्याला स्वतःचा शोध घेता येतो, त्याला जगाचा शोध घ्यायला अवघड जात नाही, असेही ते म्हणाले.

विविध उपक्रमांतर्गत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देवून गौरविण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डी. डी. पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रामदास आहेर यांनी केले. प्रा.डॉ. राजेंद्र गायकवाड यांनी आभार मानले.