ब्रेकिंग

जयहिंद शिबिरात बालकांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार ; विज्ञाननिष्ठ पिढी घडवण्याचा निर्धार

जयहिंद शिबिरात बालकांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार ; विज्ञाननिष्ठ पिढी घडवण्याचा निर्धार

जयहिंद शिबिरात बालकांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार ; विज्ञाननिष्ठ पिढी घडवण्याचा निर्धार

संगमनेर । प्रतिनिधी । निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये पाच दिवसीय निवासी युवा सर्वांगीण विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ११ ते १५ वयोगटातील १०० विद्यार्थ्यांना साहस, कला आणि क्रीडा यांसारख्या विविध क्षेत्रांतील प्रशिक्षणाद्वारे समृद्ध जीवनाचे धडे दिले जात आहेत. या उपक्रमातून विज्ञानवादी विचारांची सुदृढ पिढी घडवली जाईल, असा विश्वास संस्थेचे संस्थापक माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी व्यक्त केला.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.तांबे बोलत होते. यावेळी सौ.शरयूताई देशमुख, प्रा.हिरालाल पगडाल, प्रकल्प प्रमुख अनंत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोकचळवळ आरोग्यपूर्ण आणि सक्षम समाजाच्या निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी युवकांच्या माध्यमातून समाजातील अन्यायकारक रूढी-परंपरांना मूठमाती देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे तरुण घडवण्यासाठी नेहमीच सक्रिय भूमिका घेतली आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यभरात युवकांची एक मोठी संघटना उभी राहिली आहे.

संगमनेर तालुक्यातील १०० विद्यार्थी या पाच दिवसीय निवासी शिबिरात विविध कौशल्यांचे प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये प्रामुख्याने साहसी खेळ, योगा, छायाचित्रण, घोडेस्वारी, मातीकाम, रायफल शूटिंग, व्यायाम, स्काउट गाईड, प्रथमोपचार, लेझीम, नृत्य, झांजरी, पथनाट्य, अंधश्रद्धा निर्मूलन, ट्रेकिंग, संगीत आणि अभिनय यांसारख्या विषयांचा समावेश आहे. दररोज सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिकांसह ज्ञानार्जन करण्याची संधी मिळत आहे.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉसुधीर तांबे म्हणाले, आजचे युवक हे आपल्या देशाचे भविष्य आहे. परंतु त्यांना विज्ञाननिष्ठ विचारांची दिशा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कला आणि क्रीडा हे गुण प्रत्येकामध्ये असणे आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या मोबाईलच्या युगात अनेकजण या गुणांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व एकांगी बनते. याच कारणामुळे नैराश्य वाढण्याची शक्यता असते. एका परिपूर्ण आणि आदर्शवादी युवकाची जडणघडण व्हावी यासाठी कला, क्रीडा, साहसी खेळ, व्यायाम आणि सामाजिक बांधिलकी यांसारख्या सर्वच घटकांचे शिक्षण या निवासी शिबिरातून दिले जात आहे. शिबिरातील विद्यार्थ्यांना प्रा.लक्ष्मण घायवट, प्रा.नाना गुंजाळ, बापू कडलग, बजरंग जेडगुले, हर्षदा खैरनार, सुखदेव इल्ले यांसारख्या अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला

संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील इयत्ता पाचवी ते सातवीतील अनेक विद्यार्थी या शिबिरात एकत्र आले आहेत. त्यांना दररोज नवनवीन गोष्टी शिकायला मिळत असल्याने त्यांच्यात मोठा उत्साह संचारला आहे. नवीन मित्र, नवीन कला आणि यासोबतच राष्ट्रपुरुषांच्या जीवनावरील प्रेरणादायी व्याख्याने व देशभक्तिपर गीते यामुळे सर्व विद्यार्थी अत्यंत आनंदाने या शिबिराचा अनुभव घेत आहे. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि बौद्धिक विकासालाही चालना मिळत आहे, हे निश्चित.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!