पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे रोहमारे ट्रस्टचे आवाहन

पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे रोहमारे ट्रस्टचे आवाहन
पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे रोहमारे ट्रस्टचे आवाहन
कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील कै. भि. ग. रोहमारे ट्रस्ट तर्फे सामाजिक कृतज्ञतेच्या जाणिवेतून १९८९ पासून दरवर्षी राज्य पातळीवरील भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार देण्यात येतात. हे पुरस्कार मराठी साहित्यातील ग्रामीण कादंबरी, ग्रामीण कविता संग्रह, ग्रामीण कथासंग्रह आणि ग्रामीण साहित्य समीक्षा या ४ साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट ग्रामीण साहित्यकृतींनाच देण्यात येतात.

या पुरस्कारासाठी वरील प्रमाणे साहित्यकृतींचा विचार केला जाणार असून प्रत्येक साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या साहित्यकृतीस प्रत्येकी १५ हजार रुपये, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात येते. २०२३ या वर्षापर्यंतच्या पुरस्कारांचे वितरण झाले असून २०२४ या वर्षाच्या घोषित करावयाच्या पुरस्कारासाठी दिनांक १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या काळात प्रकाशित झालेल्या ग्रामीण साहित्यविषयक ग्रंथांचाच विचार केला जाईल.

तरी या पुरस्कारासाठी ग्रामीण लेखक व प्रकाशकांनी आपल्या ग्रंथांच्या किमान तीन प्रती कार्यवाह , ग्रामीण साहित्य पुरस्कार योजना, भि. ग. रोहमारे ट्रस्ट पोहेगाव द्वारा प्राचार्य, के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव जि. अहिल्यानगर पिन- ४२३६०१ या पत्त्यावर दिनांक ३० ऑगस्ट २०२५ पूर्वी पाठवाव्यात असे आवाहन भि. ग. रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे व पुरस्कार योजनेचे कार्यवाह प्रो. (डॉ.) जिभाऊ मोरे यांनी केले आहे. सदर पुरस्कार कोपरगाव येथील माजी आमदार कै. के. बी. रोहमारे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरू केलेला असून गेल्या ३४ वर्षांपासून नियमितपणे हा पुरस्कार दिला जातो. २०२४ या वर्षातील पुरस्कारांचे वितरण ७ डिसेंबर २०२४ रोजी म्हणजे कै. के. बी. रोहमारे (माजी आमदार) यांच्या स्मृतिदिनी करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य प्रो. (डॉ.) विजय ठाणगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.