अमृतवाहिनी बँकेने सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहीनी बँकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
अमृतवाहिनी बँकेने सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला- माजी मंत्री बाळासाहेब थोरात

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहीनी बँकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
संगमनेर ( प्रतिनिधी)-सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेने आपल्या गुणवत्तापूर्ण कामातून राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार मिळवले आहेत. आर्थिक शिस्त जपण्याबरोबर सभासद, शेतकरी, व्यापारी, ठेवीदार आणि कर्जदार या सर्वांचा मोठा विश्वास बँकेवर असून बँकेने कायम तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करताना सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण केले असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेच्या 2025 वर्षाच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सभेत चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन ॲड.नानासाहेब शिंदे, संचालक अविनाश सोनवणे, किसनराव सुपेकर, संजय थोरात, राजेंद्र काजळे, लक्ष्मण खेमनर, कचरू फड, शिवाजी जगताप, श्रीकांत गिरी, बाबुराव गुंजाळ, विवेक धुमाळ, किसन वाळके, शांताराम फड, श्रीमती ललिता दिघे, सौ कमल मंडलिक, उबेद शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की , अमृतवाहिनी बँकेच्या सध्याचा व्यवसाय हा 938 कोटी एवढा असून 11 शाखांच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करत आहे. सर्वसामान्यांच्या ठेवीचे संरक्षण करून गरजूंना कर्जाच्या रूपाने मदत करण्याचे काम बँक करत आहे. हे करत असताना बँकेमध्ये 550 कोटींच्या ठेवी असून साधारणपणे 388 कोटी रुपयांची कर्ज वाटप बँकेने केलेले आहे. एवढे कर्जवाटप असून देखील बँकेने निव्वळ एनपीए कर्जाचे प्रमाण 1.44% राखण्यात यश मिळवले आहे. आगामी वर्षांमध्ये नवीन दोन शाखांसाठीचा प्रस्ताव रिझर्व बँकेकडे दिला आहे. संगमनेरच्या आर्थिक समृद्धीमध्ये तालुक्यातील पतसंस्थांचे जाळे तसेच सहकारी बँकांचे फार मोठे योगदान आहे. संगमनेर तालुक्यामध्ये 170 पेक्षा जास्त पतसंस्था कार्यरत असून दोन हजार कोटी पेक्षा जास्त रकमेच्या ठेवी या संस्थांमध्ये सर्वसामान्य लोकांनी ठेवल्या आहेत. त्याचबरोबर विविध बारा सहकारी बँकांच्या विविध शाखांमध्ये 2500 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी आहेत. ही समृद्धी काही मंडळींच्या पहावत नसल्याने सोशल मीडिया द्वारे खोट्या बातम्या पसरून हल्ला करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. मात्र तालुक्यातील जनतेने इथला सहकार जपला असून ते अशा गोष्टींना थारा देणार नाहीत याबद्दलचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
तर चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून तालुका समृद्ध करण्याचे कार्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वांमधून झाले आहे. राज्यातील आदर्श सहकार तालुक्यात असून यामध्ये राज्यामध्ये आदर्श ठरलेला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना, त्याचबरोबर संगमनेर तालुका दूध संघ यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र तालुक्याबाहेरील काही शक्ती हे मोडण्यासाठी पुढे आल्याचे व त्यांच्यामार्फत सोशल मीडियाद्वारे खोट्या बातम्या पसरवण्याचे काम चालू असल्याचे यावेळी म्हणाले
यावेळी अंबादास वाणी यांनी प्रास्ताविक केले तर नानासाहेब शिंदे यांनी आभार मानले
“सोशल मीडिया मधून जाणीवपूर्वक संभ्रम पसरवण्याचा प्रयत्त्र”संगमनेरच्या तालुक्याचा विकास झाला ज्यांना पाहवत नाही अशा मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संगमनेरच्या चांगल्या राजकारणात हिंदू-मुस्लीम करून मनभेद निर्माण केले गेले, आणि आता आपली चांगली बाजारपेठ व आर्थिक व्यवस्था मोडण्यासाठी मुद्दाम व्हाट्सअप वर खोट्या बातम्या टाकत आहेत, त्याकडे लक्ष देऊ नका उलट त्यांना वेळीच रोखा, चांगले काम, चांगला सहकार आणि त्यातून आलेली समृद्धी आपल्याला टिकवायची असल्याचे यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.