
कोल्हे गटाची हौस; ठेकेदाराला महागात

जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीने कारवाईचे आदेश
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव शहराच्या सुखशांती नगरमधील संरक्षक भिंतीच्या कामाचे अनधिकृत भूमिपूजन संबंधित ठेकेदाराला चांगलेच महागात पडले आहे. या अनधिकृत भूमिपूजना बाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक राहुल शिरसाठ यांनी पालिका मुख्याधिकारी आणि अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. यावर अहिल्यानगर सह आयुक्त (न.प.प्र.) अभिजित हराळे यांनी अनधिकृत भूमिपूजनाबाबत ठेकेदार दिपाली मजूर यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश कोपरगाव नगरपरिषद प्रशासन व मुख्याधिकारी यांना दिले आहे.

कोपरगाव शहरातील प्र.क्र.०२ मधील सुख-शांती नगर मध्ये महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजने अंतर्गत ओपन स्पेसच्या संरक्षक भिंतींच्या बांधकामाचे भूमिपूजन ठेकेदार दिपाली मजूर व सत्ताधारी कोल्हे गटाने आपल्या नेत्याला खूष करण्यासाठी दि.१५ रोजी रविवारी सुट्टीच्या दिवशी केले त्यात भूमिपूजन करताना राजशिष्टाचार पाळता गेला नाही. या भूमिपूजन प्रसंगी नगरपरिषदेचे अधिकारी किंव्वा कर्मचारी यांच्या उपस्थितीशिवाय तसेच शासकीय शिष्टाचाराचे पालन न करता अनधिकृतरित्या करण्यात आले आहे. भूमिपूजन प्रसंगी प्रभागातील नगरसेवक तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत होणे अपेक्षित असते. मात्र परस्पर आणि मोजक्याच नगरसेवकांच्या व नगरपरिषद प्रशासनाशी संबंध नसलेल्या व्यक्तींच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन केले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक राहुल शिरसाठ यांनी आपला रोष व्यक्त करून कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी पापडीवाल आणि अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना तक्रार अर्ज दिला होता. यावर अहिल्यानगर सह आयुक्त (न.प.प्र.) अभिजित हराळे यांनी निर्णय देताना ठेकेदार दिपाली मजूर यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश कोपरगाव नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिले आहे.
कोपरगाव नगरपरिषदेत आ. आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार आमची सत्ता असो व नसो विकासकामांना आम्ही कधीच विरोध केला नाही आणि करणार ही नाही. शहरात विकासकामे करताना नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाने संबंधित नगरसेवक, नागरिक व राज शिष्टाचाराचे पालन करून कोणाची हौस करण्यासाठी नव्हे तर विकास कामे गुणवत्ता पूर्ण व वेगाने पूर्ण करण्यासाठी अधिकृत पदाधिकारी यांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन करावे. नागरिकांची दिशाभूल आम्ही खपून घेणार नाही. – नगरसेवक राहुल शिरसाठ



