लोकशाही वाचवण्यासाठी महात्मा गांधीजींचे विचार घेऊन लोकचळवळ – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
लोकशाही वाचवण्यासाठी महात्मा गांधीजींचे विचार घेऊन लोकचळवळ – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त गांधीजींच्या वेशभूषेतील 209 विद्यार्थ्यांसह भव्य प्रभात फेरी
जयहिंद लोकचळवळीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 156 वी जयंती , लालबहादूर शास्त्री यांची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त आयोजित प्रभात फेरी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, उत्कर्षा रुपवते, डॉ.नामदेव गुंजाळ, डॉ.मैथिलीताई तांबे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, आज देशाला व जगाला राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांची गरज आहे. देशातील गोरगरीब श्रीमंत सर्व जाती – धर्मातील लोक एकत्र आले आणि गांधीजींच्या नेतृत्वात स्वतंत्र्यलढा दिला. देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांचा विचार जगमान्य आहे. नेल्सन मंडेला यांनी गांधी विचारातून दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रांती घडवली तर गांधी विचारातूनच अमेरिकेमध्ये महिलांना व निग्रो यांना मतदानाचा अधिकार मिळाला.आज देशांमध्ये द्वेष पसरवला जात आहे जाती धर्माच्या नावावर भांडण लावली जात आहे. राजकारणाची पोळी भाजली जात आहे. देशात लोकशाही आणि राज्यघटना संकटात आली आहे. त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन देशातील लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी मोठी लोक चळवळ उभी करावी लागेल असे ते म्हणाले. याचबरोबर विजयादशमीच्या निमित्ताने त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.तर मा.आमदार डॉ.तांबे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील जगाने स्वीकारलेली व्यक्तिमत्त्व आहे. महात्मा जी हे शांतीचे पुरस्काराचे होते. सत्य आणि अहिंसा हे त्यांचे तत्त्व होते आज जगामध्ये सर्वाधिक त्यांच्यावर पुस्तके लिहिली गेली आहे. एक लाख 5000 पुस्तके त्यांच्यावर असून 70 देशांमध्ये त्यांचे पुतळे आहेत तर 105 देशांमध्ये त्यांच्यावर तिकिटे काढली आहे. पारतंत्र्याच्या विरोधात गांधीजींच्या नेतृत्वात मोठा लढा दिला गेला स्वातंत्र्य मिळाले आज मात्र त्यांच्या विचारांना छेद दिला जातो आहे. काही लोक गांधीजींचा द्वेष करतात. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर गांधीजींमुळेच भारताला सन्मान आहे. अहिंसा आणि नैतिकता ही त्यांच्या जीवनाचे तत्व असून त्यांनी आत्मशुद्धीला महत्त्व दिले आहे. युवकांनी गांधीजींचे विचार घेऊन पुढे जावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी साई अकॅडमीचे भगवान अहिरे, प्रा.बाबा खरात, वसंत बंदावणे, सुरेश झावरे, प्रा. प्रकाश पारखे, सुहास आहेर, एस.एम.खेमनर,चांगदेव खेमनर, डॉ.नितीन भांड,अनंत शिंदे,नामदेव कहांडळ, मिलिंद औटी, हरिभक्त परायण विनोद राऊत, अविनाश कदम, जय हिंद लोक चळवळीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सत्यजित तांबे यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश पारखे व नामदेव कहांडळ यांनी केले तर जयहिंद चे सचिव डॉ.नामदेवराव गुंजाळ यांनी आभार मानले. यावेळी शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महात्मा गांधीजींच्या वेशातील 200 विद्यार्थ्यांची प्रभात फेरी
विविध विद्यालयांमधील 200 विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची वेशभूषा केली. तर 700 विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. यशोधन कार्यालय ते संगमनेर बस स्थानक झालेल्या प्रभात फेरीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या घोषणांबरोबर गांधीजींच्या भजनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर संगमनेर बस स्थानकावर सुमारे 1000 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय वैष्णव जनतो तेरे नाम, रघुपति राघव राजाराम या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या भजनांनी संगमनेर शहर दुमदुमून दिले.



