दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान – डॉ. मैथिली तांबे यांच्या हस्ते ५% राखीव निधीचे वितरण

दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान – डॉ. मैथिली तांबे यांच्या हस्ते ५% राखीव निधीचे वितरण

संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर नगरपालिकेच्या वतीने सन २०२५-२६ अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे वितरण संत गाडगेबाबा हॉल, संगमनेर येथे उत्साहात पार पडले. यावेळी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी स्वतः निधीचे वितरण केले. यावेळी अनेक दिव्यांग बांधवांनी आपले अनुभव मांडताना त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल होणार असल्याचे सांगितले.

नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी सांगितले की, “दिव्यांग बांधवांचा सन्मान आणि स्वावलंबन हा आमच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. केवळ निधी वितरणावर न थांबता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संगमनेर नगरपरिषद कटिबद्ध आहे.” लवकरच संगमनेरमध्ये अत्याधुनिक सुविधा असलेले ‘दिव्यांग कल्याण भवन’ उभारण्यात येणार असून ते दिव्यांगांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी केंद्र ठरणार आहे.तसेच, दिव्यांग बांधवांना प्रशासकीय कामासाठी नगरपरिषदेत येताना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी तळमजल्यावर सर्व सोयींनी युक्त अशी स्वतंत्र सुविधा निर्माण करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे दिव्यांगांना शासकीय कामे सुलभपणे पूर्ण करता येणार आहेत.

यामध्ये प्रामुख्याने आमदार सत्यजीत तांबे यांनी दिव्यांगांच्या हक्कासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला या निधी वितरणासाठी त्यांचे विशेष प्रयत्न लाभदायी ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये दिव्यांग कल्याणाच्या अनेक कामांना गती मिळत आहे.यावेळी कार्यक्रमास दिव्यांग संघटनांचे अध्यक्ष विनायक दाभोळकर, जालिंदर लहामगे, अन्सार सय्यद, उपनगराध्यक्ष नुरूमोहम्मद शेख, माजी प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पगडाल तसेच सर्व सभापती, उपसभापती, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिव्यांगांसाठी महत्त्वाचे निर्णय –
– ५% राखीव निधीचे थेट वितरण
– लवकरच ‘दिव्यांग कल्याण भवन’ उभारणार
– नगरपरिषदेत तळमजल्यावर स्वतंत्र सुविधा केंद्र
– दिव्यांगांच्या प्रशासकीय कामांसाठी सुलभ व्यवस्था
– स्वावलंबन आणि सन्मानासाठी ठोस पावले
– आमदार सत्यजीत तांबे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा



