संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात अग्रगण्य- माजीमंत्री बाळासाहेब थोरात
21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात अग्रगण्य- माजीमंत्री बाळासाहेब थोरात

21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
कारखाना कार्यस्थळ येथे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 21व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सभापती शंकर पाटील खेमनर हे होते तर व्यासपीठावर मा.आ.डॉ.सुधीर तांबे,आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पा.खेमनर, ॲड.माधवराव कानवडे, सौ.दुर्गाताई तांबे, पांडुरंग पा.घुले, लक्ष्मणराव कुटे, सुधाकर जोशी,संपतराव डोंगरे,रामहरी कातोरे, इंद्रजीत भाऊ थोरात, रणजीतसिंह देशमुख, सुनील कडलग, संचालक कैलासराव पानसरे, मनीष गोपाळे, सुरेश कानोरे, सतीश खताळ,सौ.दिपाली वर्पे, अनिल घुगे, सखाराम शरमाळे, निलेश कडलग,मनसुख भंडारी, निसार शेख,सचिन करपे, सचिव सतीश गुंजाळ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, व्यापाऱ्यांना चांगली सुविधा मिळावी व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला बाजार भाव मिळावा म्हणून मध्यस्थीची भूमिका असणारी बाजार समिती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केली. ही कल्पना पुढे देशभर राबवली गेली. संगमनेर तालुक्याच्या बाजार समितीने कायम शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. वडगाव पान, साकुर, आंबी दुमाला,निमोन येथे उपबाजार निर्माण केले आहेत. आधुनिक सुविधा पुरवले आहेत. शेतकऱ्यांनी यापुढे आपला शेतमाल हा बाजार समितीत विकावा असे आवाहन करताना केंद्र सरकारने मागील वर्षी तीन काळे कायदे केले या कायद्याविरोधात उत्तर भारतात मोठे आंदोलन झाले म्हणून ते कायदे रद्द केले. अन्यथा बाजार समित्या रद्द झाल्या असत्या. असे सांगताना बाजार समिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने चांगले काम केले असून जिल्ह्यात प्रथम व राज्यात आपला मोठा लौकिक निर्माण केला असल्याचे ते म्हणाले.तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, शेतकरी हा देशाचा आत्मा आहे. त्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे त्याला चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. या करता बाजार समिती, शेतकी संघ या सुविधा असून राज्यामध्ये अनेक बाजार समिती अडचणीत आले आहे मात्र लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर बाजार समितीने नाशिक विभागात व जिल्ह्यात प्रथम क्रमांक कायम ठेवला असल्याचे ते म्हणाले.तर सभापती शंकर पाटील खेमनर म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली वडगाव पान येथील सोळा एकर जागा बाजार समितीने घेतली असून त्या ठिकाणी विकासाची कामे सुरू आहेत. एक हजार टन साठवणक क्षमता असलेली गोडाऊन त्या ठिकाणी बांधले जात आहे. या ठिकाणी असलेल्या शेतमालाला तारण म्हणून कर्ज देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच आंबी खालसा येथे 15 एकर जागा शेतमाल खरेदी विक्रीसाठी घेतली आहे. निमोन येथेही दोन एकर जागा कांदा मार्केट साठी सुरू केली असून लूज कांदा वडगाव पान येथे सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी दोनशे रुपयांचा फायदा होत आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या बाजार समितीमध्ये उत्पन्नाचे स्रोत कमी असल्याने कर्मचाऱ्यांचा पगार हा सरकारने करावा अशी मागणी करताना संगमनेर बाजार समितीने अत्याधुनिक सॉफ्टवेअर घेतली असून त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने बाजार भाव कपातीची माहिती मिळत असल्याचे ते म्हणाले.यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी,शेतकरी,सेवा सोसायटीचे पदाधिकारी, शेतमाल उत्पादक, व्यापारी, आडतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेच्या नोटीसचे वाचन सचिव सतीश गुंजाळ यांनी केले तर अनिल घुगे यांनी आभार मानले.



