ब्रेकिंग

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातारा येथे ज्येष्ठ लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांची घेतली भेट

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातारा येथे ज्येष्ठ लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांची घेतली भेट

संगमनेर । प्रतिनिधी । यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार म्हणून ओळख असलेले महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातारा येथे ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ. अ.ह. साळुंखे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

सातारा येथील महाराष्ट्राचे ज्येष्ठ लेखक डॉ.अ.ह. साळुंखे यांच्या निवासस्थानी माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्या तब्येतीची चौकशी करून राज्यातील राजकारण, साहित्य, समाजकारण व संस्कृती अशा विविध विषयांवर चर्चा केली.याप्रसंगी बोलताना माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, विचारांप्रती निष्ठा जपणारे आणि समाजापर्यंत सत्य पोहोचावे यासाठी आयुष्यभर लेखणी झिजवणारे डॉ. साळुंखे हे थोर साहित्यिक आहेत. आजही ते आपल्या लेखनातून समाजभान जागृत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. त्यांनी लिहिलेले विद्रोही तुकाराम हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचण्यासारखे आहे. रूढी परंपरांच्या विरोधात तुकाराम महाराजांनी आवाज उठवला. संत आणि समाज सुधारक यांचा सुंदर मिलाप या पुस्तकातून डॉ साळुंखे यांनी मांडला आहे. महाराष्ट्राच्या एकात्मतेचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.

यावेळी डॉ. साळुंखे म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणात लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासारखी दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे. आजचे राजकारण हे दुर्दैवी झाले असून बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेतृत्वाची खरी समाजाला गरज आहे.यावेळी चोखिया आणि बळीवंश ही पुस्तके त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना भेट दिली.याप्रसंगी संत चोखामेळा यांच्या जीवनकार्यावर दोघांमध्ये सखोल चर्चा झाली. संत चोखामेळा यांच्या कुटुंबात पाच संत होते — चोखामेळा, पत्नी सोयराबाई, मुलगा कर्ममेळा, बहीण निर्मळा आणि मेहुणे बंका. हे सर्वजण अभंगरचनाकार व विठ्ठलभक्त होते. त्यांच्या कुटुंबीयांनी तत्कालीन व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला; त्यांना मंदिरप्रवेश नाकारला गेला, मात्र त्यांच्या विचारांना आणि शब्दांना कोणीही थांबवू शकले नाही. त्यांच्या अभंगांमधून आणि लेखणीतून तत्कालीन समाजव्यवस्थेतील उणिवा जगासमोर आल्या. “अबीर गुलाल उधळीत रंग” हा संत चोखामेळा यांनी रचलेला वारकरी संप्रदायातील अत्यंत लोकप्रिय आणि भावपूर्ण अभंग आहे. “अवघा रंग एक झाला” हा संत सोयराबाई यांनी रचलेला अजरामर अभंग असून, तो वारकरी संप्रदायातील अद्वैत भक्तीचे प्रतीक मानला जातो. या सर्व आठवणींना या गप्पांमध्ये उजाळा देण्यात आला.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांची साहित्याविषयीची ओढ, साहित्य क्षेत्राशी असलेला स्नेह आणि विचारांसाठी जगणाऱ्या साहित्यिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची त्यांची भूमिका सर्वश्रुत आहे. नाशिक येथे झालेल्या साहित्य संमेलनातील त्यांचे भाषण आणि साहित्य क्षेत्राला स्वातंत्र्य व स्वाभिमानाची त्यांनी करून दिलेली जाणीव आजही अनेकांच्या स्मरणात असल्याचे डॉ साळुंखे म्हणाले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!