ब्रेकिंग

आरोग्यविरा – डॉ.जयश्रीताई थोरात

महिलांच्या सबलीकरणासाठी झटणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व

आरोग्यविरा – डॉ.जयश्रीताई थोरात


महिलांच्या सबलीकरणासाठी झटणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व

संगमनेर । विनोद जवरे । भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून महिलेला पूजनीय स्थान दिले गेले आहे. “ यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता ” हे तत्व आजही समाजमनात खोलवर रुजलेले आहे. स्त्री ही शक्ती आहे, ती विश्वाची जननी आहे आणि तिच्यातील सामर्थ्य व कर्तृत्व पुरुषांएवढेच नव्हे तर अनेक वेळा त्याहून अधिक ठरते, हे आजच्या काळातील महिला सिद्ध करून दाखवत आहेत.संगमनेर तालुक्यातील एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि आरोग्य व समाजसेवेसाठी आपले जीवन वाहिलेल्या आरोग्यविरा डॉ. जयश्रीताई थोरात या अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. त्यांनी महिलांच्या आरोग्य, आत्मनिर्भरता आणि सामाजिक प्रबोधनासाठी विविध उपक्रम राबवत संगमनेर तालुक्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

परंपरेतून लाभलेले संस्कार –

डॉ.जयश्रीताई थोरात या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात नावलौकिक मिळवलेले, मितभाषी पण लोकाभिमुख नेतृत्व करणारे, प्रदीर्घ काळ राज्य मंत्रिमंडळात विविध मंत्रीपदे भूषवलेले लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आहेत. त्यांना समाजसेवेचे बाळकडू घराण्यातील परंपरेतूनच लाभले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या सामाजिक कार्याचे संस्कार आणि बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनातूनच जयश्रीताईंच्या कार्याचा पाया घडला. याच परंपरेचा वारसा पुढे नेत त्यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी “एकविरा फाउंडेशन” ची स्थापना केली.

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान 

डॉ.जयश्रीताई थोरात यांनी एमबीबीएस व एमडी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई येथील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल येथे ब्लड कॅन्सर विभागात उल्लेखनीय सेवा बजावली. कोरोनाच्या काळात त्यांनी डॉक्टर म्हणून केलेले कार्य लोकांच्या मनात कायमची छाप सोडणारे ठरले. आरोग्य क्षेत्रातील या अनुभवाचा उपयोग करून त्यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले. महिलांसाठी आरोग्य शिबिरे, मोफत तपासणी, कॅन्सर संदर्भातील जनजागृती, तसेच युवतींसाठी आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम ही त्यांच्या कार्याची ठळक उदाहरणे आहेत.

एकविरा फाउंडेशन – महिलांसाठी सबलीकरणाचे व्यासपीठ

एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात महिलांना केवळ व्यासपीठच मिळाले नाही, तर आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचा मार्गही खुला झाला. फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात आले. गणेशोत्सव काळात निर्माल्य संकलन उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. महिलांसाठी क्रीडा महोत्सव, योग व झुंबा कार्यशाळा, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. कोविड – 19 काळात आशा व अंगणवाडी सेविकांचा गौरव सोहळा आयोजित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी बचतगटांना शिवणकाम, उदबत्ती, धूप, मेणबत्ती, पापड-लोणची, कुरडया, मसाले, केक-बिस्कीट, घरगुती खाद्यपदार्थ, ब्युटी पार्लर, तोरण, मोत्यांची रांगोळी आदी प्रशिक्षण देण्यात आले.बचतगटातील महिलांसाठी आर्थिक साक्षरता मोहीम, दिवाळी मार्केट उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग व प्रॉडक्ट फोटोग्राफी करून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे कामही फाउंडेशनने केले आहे.

शिक्षण, समाजप्रबोधन आणि सांस्कृतिक उपक्रम 

फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकल, बॅग, वह्या वाटप करण्यात आले तसेच स्पर्धा परीक्षांसाठी लायब्ररी व पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. महिला व विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक व्याख्याने घेऊन समाज जागृती केली.हस्तकला प्रशिक्षण, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मथुरागिणी महोत्सव, तसेच इंदिरा महोत्सवासारखे तीन दिवसीय उपक्रम राबवण्यात आले. सैनिकांना स्वतः बनवलेल्या राख्या पाठवून देशभक्तीचा संदेश देण्यात आला.युवा शेतकऱ्यांसाठी महारेशीम अभियानांतर्गत तुती लागवड व कीटक संगोपन मार्गदर्शन करण्यात आले. नवरात्रोत्सव निमित्त विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांच्या “एकविरा मुलाखती” या उपक्रमातून महिलांचे अनुभव व यशोगाथा समाजासमोर आणण्यात आल्या. नवरात्रोत्सवात दांडिया महोत्सव आयोजित करून महिलांना सांस्कृतिक आनंदाचा अनुभव देण्यात आला. तसेच “आम्ही संगमनेरी विठुरायाचे वारकरी” हा भक्तीमय सोहळा ही आयोजित करण्यात आला.

लोकांशी असलेली नाळ – गेल्या सहा ते सात वर्षांपासून डॉ. जयश्रीताई थोरात सातत्याने तालुक्यातील जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होत आहेत. वाडी – वस्तीवर जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेणे, त्यांच्या वेदना समजून घेणे आणि उपाय शोधणे हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे.

तरुणाईसाठी प्रेरणास्थान – साहित्य, कला, क्रीडा, राजकारण आदी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे अनेक तरुणांनी नवी उभारी घेतली आहे.

एक मैत्रीण – एक मार्गदर्शक – आज संगमनेर तालुक्यातील महिला व युवतींसाठी डॉ.जयश्रीताई थोरात फक्त समाजसेविका नाहीत, तर त्या एक जिवलग मैत्रीण, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरल्या आहेत. त्यांच्या कार्यामुळे महिलांचे जीवनमान उंचावले असून आत्मनिर्भरतेचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला आहे. डॉ.जयश्रीताई थोरात या नावामागे समाजासाठी कार्य करणारी डॉक्टर, महिलांच्या सक्षमीकरणासाठी झटणारी नेतृत्त्वशील समाजसेविका आणि जनतेच्या सुख-दुःखात कायम उभी राहणारी लोकसेविका अशी तिहेरी ओळख दडलेली आहे. आदरणीय डॉ.जयश्रीताई थोरात यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा !

– विशाल काळे

(सोशल मीडिया समन्वयक, यशोधन जनसंपर्क कार्यालय)

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!