संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर तालुक्याचे सुपुत्र अजिंक्य रहाणे यांनी आपल्या शांत, संयमी आणि विश्वासपूर्ण खिलाडूवृत्तीने जागतिक पातळीवर आपली मोठी ओळख निर्माण केली. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवून देण्याची कामगिरी त्यांनी केली असून कसोटी वनडे आणि टी-20 सर्वांमध्ये त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी दिलेले योगदान हे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सदैव अभिमानास्पद असल्याचे गौरवउद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले असून अजिंक्य रहाणे यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटमधून निवृत्तीने सर्वांना हुरहुर लागली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावचे असलेले अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला मोठा दबदबा निर्माण केला. त्यांनी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे देशभरातील त्यांच्या तमाम चाहत्यांना मोठा धक्का बसला.यानंतर बोलताना मा. महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, अजिंक्य रहाणे यांनी सातत्य, चिकाटी आणि मोठ्या जिद्दी मधून भारतीय संघामध्ये आपले स्थान निर्माण केले. शांत संयमी आणि विश्वासार्त असलेला खेळाडू अशी त्यांची ओळख निर्माण झाली. संगमनेरच्या माती पासून निघालेल्या त्यांचा प्रवास आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला. अजिंक्यच्या नेतृत्वामध्ये भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया मध्ये कसोटी मालिकेत विजय मिळवला हा देशासाठी अभिमानास्पद क्षण होता.
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांच्यासारख्या वरिष्ठ क्रिकेटपटून बरोबर त्याने अनेक भागीदारी केल्या. आयपीएलमध्ये ही सातत्याने चांगली कामगिरी राहिली. मागील दोन वर्षापासून केकेआर चे नेतृत्व त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळत असताना संगमनेरच्या मातीशी कायम नाळ घट्ट ठेवली. विविध समारंभ किंवा घरगुती कार्यक्रमांसाठी ते संगमनेरला आवर्जून आले.याचबरोबर संगमनेर मधील निवेदित क्रिकेटपटूंना आपण मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा हा प्रवास असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. मोठ्या जबाबदारीने खेळणे, संघहिताला नेहमी वैयक्तिक यशापेक्षा प्राधान्य देणे आणि कोणताही गाजावाजा न करता सातत्याने आपली जबाबदारी पार पाडणे हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ठरली आहे.त्यांच्या निवृत्तीने तमाम क्रीडापटूंच्या मनामध्ये हुरहुर निर्माण झाली असून संगमनेर तालुक्याच्या सुपुत्र अजिंक्य रहाणे यांचे क्रिकेट मधील योगदान हे देशासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आणि संगमनेर तालुक्यासाठी सदैव अभिमानास्पद राहील असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
अजिंक्य रहाणे ने संगमनेरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले- आमदार सत्यजित तांबे
संगमनेर तालुका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विकसित तालुका म्हणून ओळखला जातो. याचबरोबर या तालुक्यातील सुपुत्र अजिंक्य रहाणे यांनी आपल्या कर्तुत्वाने तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले असून त्यांच्या निवृत्तीने सर्वांना हळहळ लागली आहे. आपला अजिंक्य ही त्यांची ओळख संगमनेरकरांसाठी कायम असून संगमनेरच्या विविध कार्यक्रमांमधून त्यांनी सातत्याने युवकांना मार्गदर्शन केले आहे. यापुढील काळातही ते आपल्या तालुक्यातील युवकांना मार्गदर्शन करतील. याचबरोबर संगमनेर मधील युवकांसाठी जयहिंदच्या माध्यमातून क्रिकेट ॲकॅडमी साठी ही ते मार्गदर्शन करतील असा विश्वास आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला.
थँक्यू अजिंक्य डॉ. जयश्रीताई थोरात
आपल्या तालुक्याचे सुपुत्र अजिंक्य रहाणे यांनी संगमनेरचे नाव देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवले. अजिंक्य रहाणे जेव्हा मैदानावर खेळण्यासाठी यायचे तेव्हा प्रत्येक संगमनेरकर अभिमानाने सांगायचा की हा आमचा अजिंक्य आहे. देशासाठी आणि क्रीडा क्षेत्रासाठी दिलेल्या समर्पित भावनेतील योगदानाबद्दल तमाम संगमनेरकरांच्या वतीने थँक्यू अजिंक्य म्हणत तुमचा आम्हा सर्वांना गर्व असल्याचे संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे.तर अजिंक्य रहाणे यांच्या यशस्वी कारकीर्दीबद्दल महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, ॲड माधवराव कानवडे,पांडुरंग पाटील घुले , रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे, आर.बी राहणे, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, इंद्रजीत भाऊ थोरात, रामहरी कातोरे, विजय राहणे, भाऊराव राहणे, हौशीराम सोनवणे,शांताराम कढणे, अजय फटांगरे ,सोमेश्वर दिवटे, सौ अर्चनाताई बालोडे, सुभाष सांगळे निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, ॲड अमोल शेरकर, यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात होणाऱ्या विविध कार्यक्रमांना कायम उपस्थिती दर्शवली. तर प्रत्येक कार्यक्रमांमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही अजिंक्य रहाणे यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. अमृतवाहिनी येथील मेधा, जय हिंद क्रिकेट स्पर्धा सहकार महर्षी क्रिकेट चषक यांच्यासह विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहिले.