आशा भोसले यांच्या निधनाने एका दैवी स्वराचा अंत – ना.विखे पाटील

आशा भोसले यांच्या निधनाने एका दैवी स्वराचा अंत – ना.विखे पाटील

शिर्डी । प्रतिनिधी । भारतीय संगीत क्षेत्राचा आधारस्तंभ आणि आपल्या सुरावटींनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. शास्त्रीय संगीतापासून ते पॉप आणि लावणीपर्यंत सर्वच गायन प्रकारांत त्यांनी उमटवलेला ठसा अजरामर आहे. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या शोक संदेशात ना.विखे पाटील म्हणाले की, “स्वरसम्राज्ञी आशा भोसले आता आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाही. त्यांच्या निधनाने भारतीय संगीताचा जणू ‘आशा-दीप’च विझला आहे, अशी भावना आज प्रत्येक संगीतप्रेमीची झाली आहे. सहा दशकांहून अधिक काळ संगीत सेवेसाठी समर्पित झालेल्या त्यांच्या जादूई आवाजाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केले होते. मराठी आणि हिंदीसह अनेक भाषांतील गाण्यांमधून त्यांनी विविधतेतून एकतेचे दर्शन घडवले. भारताच्या एकसंघ भावनेचा आवाज त्यांच्या गायकीत होता.” ते पुढे म्हणाले की, “आशा भोसले हे केवळ एक नाव नसून संगीतातील चैतन्य होते. आवाजातील कमालीची लवचिकता आणि कोणत्याही शब्दाला आपल्या सुरांनी जिवंत करण्याची अफाट कला त्यांच्याकडे होती. आजही त्यांचे गाणे ऐकल्याशिवाय मराठी आणि हिंदी रसिकांचा दिवस पूर्ण होत नाही. जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीची वेगळी ओळख निर्माण करण्यात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. त्यांच्या निधनाने सांस्कृतिक विश्व समृद्ध करणारा एक स्वर कायमचा शांत झाला आहे.”



