कर्डिले साहेबांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ; अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा – डॉ. सुजय विखे पाटील
राहुरीत कार्यकर्त्यांची भव्य बैठक; तनपुरे परिवाराच्या भूमिकेचे कौतुक

कर्डिले साहेबांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ; अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा – डॉ. सुजय विखे पाटील


राहुरीत कार्यकर्त्यांची भव्य बैठक; तनपुरे परिवाराच्या भूमिकेचे कौतुक
उंबरे । प्रतिनिधी । राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक ही स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याला आणि त्यांनी निर्माण केलेल्या विश्वासाला न्याय देण्याची संधी आहे, असे भावनिक प्रतिपादन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले. उंबरे व ब्राम्हणी गणातील कार्यकर्त्यांच्या भव्य बैठकीत बोलताना त्यांनी अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करत सर्व घटकांनी एकजुटीने विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला.

राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे माहितीचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारात राहुरी तालुक्यातील उंबरी व ब्राह्मणी गणातील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम तसेच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेच्या सुरुवातीला डॉ. विखे पाटील यांनी सर्व उपस्थितांच्या वतीने विविध स्तरावर योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. विशेषतः तनपुरे परिवाराच्या भूमिकेचे कौतुक करत ते म्हणाले की, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेला निर्णय हा माणुसकी, संस्कार आणि राजकीय परिपक्वतेचे उदाहरण आहे. एवढा मोठा त्याग करणे सोपे नसते. तसेच, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी एकत्र येत दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राजकारणात सर्वसमावेशकता अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही गटाच्या व्यक्तीची अवहेलना न करता एकजुटीने काम करणे हीच खरी ताकद आहे, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक एकत्रितपणे लढवली जात असून, मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही शेवटची संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले. आगामी काळात मतदारसंघाची पुनर्रचना होणार असल्याने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी राहुरी तालुक्यातील उबाटा गटाचे तालुकाप्रमुख सचिन म्हसे यांनी डॉ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रवेशामुळे महायुतीची ताकद आणखी वाढले आहे बैठकीत संघटन बळकट करण्यावर विशेष भर देत विकासाच्या मुद्द्यांवर जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी, येत्या २३ तारखेला होणाऱ्या मतदानात कमळ चिन्हासमोरील बटण दाबून भारतीय जनता पार्टी व महायुतीला बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले.



