ब्रेकिंग
स्पर्धा परीक्षा यशासाठी विद्यार्थ्यानी झपाटून अभ्यासाला लागणे गरजेचे – गायकवाड
स्पर्धा परीक्षा यशासाठी विद्यार्थ्यानी झपाटून अभ्यासाला लागणे गरजेचे – गायकवाड

खेडे । गायत्री शिरसाट।
पिंपळस – ‘एम. पी. एस. सी. व यू. पी. एस. सी स्पर्धा परीक्षांची तयारी ही पदवीनंतर विद्यार्थ्यांसाठी एक चांगला मार्ग असून जीवनात एका उच्च यशाला गवसणी घालण्याची गुरुकिल्ली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यानी विद्यार्थीदशेतच या स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करावी . स्पर्धा परीक्षेमधील यशासाठी सातत्य व झपाटून अभ्यासाला लागणे गरजेचे असते’ असे प्रतिपादन इन्फिनिटी अकॅडेमी नाशिकचे शाखाप्रमुख व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक श्री. बापू गायकवाड यांनी केले. के. के. वाघ शिक्षणसंस्था संचलित, के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय भाऊसाहेबनगर, पिंपळस (रामाचे) व इन्फिनिटी अकॅडेमी शाखा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धा परीक्षा विभाग अंतर्गत ‘एम. पी. एस. सी. व यू. पी. एस. सी. स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी’ या विषयावर एकदिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बापू गायकवाड बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रा. सुनीता शिरसाठ यांनी उपक्रमाचा हेतु व उद्देश प्रस्ताविकाद्वारे स्पष्ट करून दिला .कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. किरण वाघ यांनी प्रमुख मार्गदर्शक श्री. बापू गायकवाड यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. बापू गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये कष्ट करण्याची जिद्द व उत्तम बुद्धीकौशल्य आहे. परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने आजही बरेच विद्यार्थी या परिक्षाकडे वळत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यानी या स्पर्धा परीक्षा, त्यासाठी लागणारी पात्रता, अभ्यासक्रम, संदर्भ पुस्तके यांची माहिती करून घ्यायला हवी. स्पर्धा परीक्षेमधील यशासाठी सातत्याने अभ्यास व चालू घडामोडी यांचे अध्ययन करायला हवे. विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्याशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरासन केले. इन्फीनिटी अकॅडेमीचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री. सागर हांगे यांनी स्पर्धा परिक्षाची संदर्भ पुस्तके कोणती वापरावी याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी दर महिन्यास स्पर्धा परीक्षासंदर्भात विद्यार्थ्याना मार्गदर्शन करता येईल याबाबत काही उपक्रम सुरू करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. किरण वाघ यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन मिळावे यासाठी महाविद्यालय सातत्याने नवनवीन उपक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करीन असे प्रतिपादन केले.
स्पर्धा परीक्षा सेमिनार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उषा गायकर यांनी केले. प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय प्रा. वृषाली कोरडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. पूनम थेटे यांनी केले. कार्यक्रमासाठी विज्ञान विभागप्रमुख प्रा. ज्ञानेश्वरी तासकर, सेमिनार समन्वयक प्रा. मनोज गायकवाड यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,