ब्रेकिंग

झाडे लावायची तरी कशाला? – माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

झाडे लावायची तरी कशाला? – माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

झाडे लावायची तरी कशाला? – माजी आमदार डॉ. सुधीर तांबे
संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे पर्यावरणाला गंभीर फटका बसत असून या घटनांबाबत प्रशासनाकडून समाधानकारक उपाययोजना होत नसल्याचा आरोप माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केला. मालदाड येथे लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

वारंवार लागणाऱ्या आगींमुळे झाडे आणि वन्यजीवांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि नैराश्य वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “आपण दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहोत. मात्र, अशा प्रकारे आगी लागत राहिल्या तर झाडे लावायची तरी कशाला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.हे चित्र केवळ संगमनेरपुरते मर्यादित नसून राज्यभरात अनेक ठिकाणी अशा घटना घडत असल्याचे त्यांनी सांगितले. पेठ आणि कळवण तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर जंगलांना आग लागल्याची उदाहरणे त्यांनी दिली. मालदाड येथे अलीकडेच डोंगरावर लागलेल्या आगीमुळे स्थानिक सरपंच आणि नागरिक हतबल झाल्याचे त्यांनी नमूद केले.

जंगलांना आग लागू नये यासाठी प्रभावी उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत त्यांनी वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “झाडे लावण्याबरोबरच ती जगली पाहिजेत, यासाठी जनजागृती आणि ठोस कृती आवश्यक आहे. आगी का लागतात याचे नेमके कारण शोधून त्यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात वनमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे सांगत, राज्यभरातील जंगलांमध्ये लागणाऱ्या आगी रोखण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही डॉ. तांबे यांनी केली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!