ब्रेकिंग
क्रीडांगणावरील अतिक्रमण हटवण्यासाठी चिकणी येथे आजपासून उपोषण

क्रीडांगणावरील अतिक्रमण हटवण्यासाठी चिकणी येथे आजपासून उपोषण


चिकणी गावाला सुसज्ज व सुशोभित क्रीडांगण मिळावे यासाठी आनंद वर्पे यांचे आजपासून आमरण उपोषण
संगमनेर । प्रतिनिधी । गावातील मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी ग्राम पातळीवर चांगली क्रीडांगण असावी या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना पत्र देऊन सरकारी गट नंबर ४ मधील २ हेक्टर क्षेत्राची मागणी केली होती मात्र ग्रामपंचायतीने या क्षेत्रावरील अतिक्रमणे काढून क्रीडांगणाची जागा मोकळी करून देण्यासाठी दिलेली एक महिन्याची मुदत संपूनही ही कारवाई झाली नाही त्यामुळे संगमनेर तालुका किसान ( शेतकरी शेतमजूर ) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आनंद निवृत्ती वर्पे व वैभव रावसाहेब वर्पे यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार रोजी चिकणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रशासनाच्या विरोधात अमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वरपे यांनी म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यातील चिकणी गावठाण शिवारात गावातील मुलांना खेळण्यासाठी सुशोभित क्रीडांगण असावे अशी ग्रामस्थांची इच्छा आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीकडे महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा सरकारी गट नंबर ४ मधील जागेची मागणी करण्यात आली होती. या सरकारी जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत अतिक्रमणे करण्यात आली आहे. ही अतिक्रमण काढण्याची विनंती ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तसेच तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्याकडे करीत वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. तसेच सदर गट नंबरची मोजणी देखील झालेली आहे मात्र अद्यापही सदर अतिक्रमण न काढल्याने क्रीडांगणाचे काम सुरू होत नाही.याबाबत आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ग्रामपंचायतीने २५ मार्च २०२६ रोजी आनंद वर्पे व ज्ञानेश्वर वर्पे यांना पत्र देऊन आपल्या मागणीप्रमाणे मोजणी फी भरली आहे तसेच क्रीडांगणासाठी २ हेक्टर क्षेत्राची मागणी ग्रामपंचायतीने तहसील कार्यालय मार्फत केली आहे. सदर प्रस्तावाची पोहोच घेतली आहे तरी १ महिन्यामध्ये पुढील सर्व पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन देत सदरचे उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती मात्र तो कालावधी उलटूनही परिस्थितीत जैसे थे असल्याने स्थानिक प्रशासनाकडून अतिक्रमण काढून क्रीडांगणासाठी जागा मोकळी करून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी यांना केली आहे. अन्यथा ग्रामस्थांनी आज दिनांक एक मे पासून चिकणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला आहे.



