ब्रेकिंग

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शिष्टमंडळाचा ऑस्ट्रेलिया दौरा : अत्याधुनिक ऊस संशोधन तंत्रज्ञानाचा अभ्यास

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शिष्टमंडळाचा ऑस्ट्रेलिया दौरा : अत्याधुनिक ऊस संशोधन तंत्रज्ञानाचा अभ्यास

जाहिरात मो-7756045359
व्हीएसआय आणि ऑस्ट्रेलियन संशोधन संस्थांमध्ये तांत्रिक सहकार्याला चालना : माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर । प्रतिनिधी । महाराष्ट्रातील ऊस शेती आणि साखर उद्योग अधिक आधुनिक, संशोधनाधारित व जागतिक स्पर्धात्मक बनविण्याच्या उद्देशाने पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने ऑस्ट्रेलियातील विविध जागतिक दर्जाच्या ऊस संशोधन संस्था, प्रगत प्रयोगशाळा, फिनॉमिक्स केंद्रे, स्पीड ब्रीडिंग सुविधा तसेच आधुनिक साखर कारखान्यांना भेट देत सविस्तर अभ्यास दौरा केला.

या शिष्टमंडळामध्ये माजी मंत्री तथा व्हीएसआय नियामक मंडळ सदस्य मा. बाळासाहेब थोरात, मा. राजेश टोपे यांच्यासह पीक उत्पादन व संरक्षण विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग, ऊस प्रजनन विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुशीर कपिल आणि रेणूजीवशास्त्र व जनुकीय अभियांत्रिकी विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अशोक जगताप यांचा समावेश होता.दौर्‍यादरम्यान शिष्टमंडळाने ‘शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया’च्या अत्याधुनिक ‘आयरिस’ प्रयोगशाळेला भेट दिली. या प्रयोगशाळेमध्ये ऊस जीनोमिक्स, रोग निदान, टिश्यू कल्चर, साइटोजेनेटिक्स, कीड व रोग व्यवस्थापन तसेच मृदा आणि पोषण विश्लेषणासंदर्भातील आधुनिक संशोधन सुविधा उपलब्ध असून ऊस उद्योगासाठी वेगवान आणि अचूक संशोधन कार्य येथे केले जाते.तसेच ‘द युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड’ येथील स्पीड ब्रीडिंग सुविधेची पाहणी करण्यात आली. नियंत्रित तापमान, कृत्रिम प्रकाश व्यवस्था आणि आधुनिक नियंत्रित वातावरण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कमी कालावधीत नवीन ऊस व इतर पिकांच्या जाती विकसित करण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास शिष्टमंडळाने केला. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अधिक उत्पादनक्षम आणि प्रतिकारक्षम वाण विकसित करण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.शिष्टमंडळाने ‘शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया’ अंतर्गत कार्यरत प्रसिद्ध फोटोपीरियड सुविधा आणि हायड्रोपोनिक्स संशोधन केंद्रालाही भेट दिली. कृत्रिम प्रकाश नियंत्रणाद्वारे ऊसात फुलोरा प्रेरित करण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यात आला. विविध देशांतील ऊस प्रजनन कार्यक्रमांसाठी मेरिंगा केंद्राला विशेष महत्त्व असून येथे विकसित होणारे संशोधन जागतिक स्तरावर उपयोगी ठरत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

याशिवाय ‘वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी’ अंतर्गत कार्यरत ‘ऑस्ट्रेलियन प्लांट फिनॉमिक्स नेटवर्क’च्या अत्याधुनिक नियंत्रित वातावरण व हाय-थ्रूपुट फिनॉमिक्स सुविधेचीही पाहणी करण्यात आली. ड्रोन, सेन्सर, इमेजिंग प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा अॅनालिटिक्सच्या साहाय्याने पिकांची वाढ, दुष्काळ सहनशीलता, पोषण कार्यक्षमता आणि उत्पादन क्षमता यांचे अचूक विश्लेषण कसे केले जाते याचा अभ्यास शिष्टमंडळाने केला.ऑस्ट्रेलियातील आधुनिक साखर कारखान्यांनाही भेट देत ऊस गाळप, ऊर्जा निर्मिती, बॅगॅसचा पुनर्वापर, स्वयंचलित मिल व्यवस्थापन, कार्यक्षम प्रोसेसिंग आणि शाश्वत साखर उत्पादन पद्धतींचा सखोल अभ्यास करण्यात आला. ऑस्ट्रेलियातील साखर उद्योगामध्ये उत्पादकता, गुणवत्ता आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाला विशेष प्राधान्य दिले जात असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

या अभ्यास दौर्‍यामुळे महाराष्ट्रातील ऊस शेतीमध्ये आधुनिक जैवतंत्रज्ञान, स्पीड ब्रीडिंग, फिनॉमिक्स, रोग व्यवस्थापन आणि हवामान बदलास प्रतिकारक्षम ऊस जाती विकासासाठी नवे तंत्रज्ञान उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. भविष्यात व्हीएसआय आणि ऑस्ट्रेलियातील संशोधन संस्थांमध्ये संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी व शास्त्रज्ञ देवाणघेवाण तसेच तांत्रिक सहकार्याचे नवे मार्ग खुले होतील, असा विश्वास माजी महसूल व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!