युवकांनी आधुनिकतेचा स्वीकार करताना भारतीय संस्कृतीतील मूल्ये व संस्कार जपावे – कडासने

युवकांनी आधुनिकतेचा स्वीकार करताना
भारतीय संस्कृतीतील मूल्ये व संस्कार जपावे – कडासने


युवकांनी आधुनिकतेचा स्वीकार करताना
भारतीय संस्कृतीतील मूल्ये व संस्कार जपावे – कडासने
कोपरगांव । प्रतिनिधी । आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात युवकांसमोर अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र सोशल मिडिया, व्यसनाधीनता, चुकीची संगत आणि भौतिक सुखांच्या आहारी जाण्याचा धोका देखील वाढला आहे. अशावेळी युवकांनी आधुनिकतेचा स्वीकार करताना भारतीय संस्कृतीतील मूल्ये, संस्कार आणि आध्यात्मातील विचार जपणे आवश्यक आहे. असे मार्गदर्शन नाशिक येथील ज्येष्ठ विचारवंत व माजी पोलीस अधिकारी सुनील कडासने यांनी केले.

गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या २२ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित केल्या गेलेल्या व्याख्यानातून ‘ जीवनातील संस्काराचे महत्व..’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील सोहळयाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज, शिर्डी पोलीस ठाण्याचे जिल्हा पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, नाशिक येथील डॉ. संजयराव सोनवणे, उद्योगपती प्रशांत परजणे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, येवल्याचे महेंद्रशेठ काले, साहेबराव सैद, कैलासचंद ठोळे, डॉ. अजेय गर्जे, नानासाहेब सिनगर, भागवतराव देवकर, आंबादास देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्व. परजणे आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.युवक हा कोणत्याही राष्ट्राचा कणा असतो. देशाचे भविष्य, प्रगती आणि विकास हे युवकांच्या विचारांवर, आचरणावर आणि कार्यक्षमतेवर अवलंबून असते. युवकांमध्ये ऊर्जा, उत्साह, जिद्द आणि नवीन कल्पना असतात. परंतु या गुणांना योग्य दिशा देण्यासाठी संस्कारांची आवश्यकता असते. संस्कारांमुळे युवकांचे व्यक्तिमत्त्व घडत जाते. त्यातून मग ते समाजासाठी आदर्श नागरिक बनतात असे सांगून श्री कडासने पुढे म्हणाले, संस्कारांमुळे माणसामध्ये प्रामाणिकपणा, शिस्त, नम्रता, आदर, सहकार्य आणि कर्तव्यनिष्ठा यांसारखे गुण विकसित होतात. चांगले संस्कार असलेली व्यक्ती समाजात आदराचे स्थान मिळवते. ती स्वतःचे तसेच समाजाचे हीत जपण्याचा प्रयत्न करते.संस्कारामुळे चांगल्या विचारांची, नैतिक मूल्यांची आणि सद्गुणांची जोपासना होते. घर, शाळा, समाज आणि विविध सांस्कृतिक परंपरा यांमधून युवकांवर संस्कार घडत असतात. आई वडिलांचा आदर्श, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि समाजातील थोर व्यक्तींचे जीवनचरित्र यामधून मिळणारी प्रेरणाच युवकांच्या मनावर प्रामाणिकपणा, शिस्त, कर्तव्यनिष्ठा, परिश्रम, देशप्रेम आणि मानवता अशा मूल्यांचे संस्कार घडवीत जाते. संतांनी महाराष्ट्र भूमीला सुसंकृत विचारांचा समर्थ वारसा दिलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आध्यात्माचा पाया रचला तर संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला आहे. आज आपण विज्ञानाचा आणि आधुनिकतेचा कितीही पुरस्कार केला तरी माणसाच्या कर्तृत्वाला आध्यात्माचा आधार असला तरच ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो असे सांगून श्री कडासणे यांनी स्व. नामदेवराव परजणे पाटील यांचे कार्य आणि त्यांनी पुढील पिढीसाठी दिलेले संस्कार याबद्दल गौरवोद्गार काढले.पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनीही आपल्या भाषणातून युवक व युवतींना मार्गदर्शन करताना संस्कार हे व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीचे आधारस्तंभ आहेत. चांगले संस्कार असलेली पिढीच सुसंस्कृत आणि आदर्श समाज निर्माण करू शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात चांगल्या संस्कारांचे जतन करणे आणि पुढील पिढीपर्यंत ते पोहोचविणे ही काळाची गरज आहे. संस्कार हे मानवी जीवनाचे खरे अलंकार असून व्यक्तिमत्त्व विकासासाठी ते अत्यंत आवश्यक असल्याचेही श्री भारती यांनी सांगितले. आज मोबाईल ही एक गरज निर्माण झालेली असली तरी तिचा गरजेपुरता वापर करावा. मुलींनी आई वडीलांचा समाजामध्ये सन्मान रहावा यासाठी चांगले संस्कार अंगिकारावेत असेही मार्गदर्शन त्यांनी केले.महंत रमेशगिरीजी महाराज व सौ. शालिनीताई विखे पाटील यांनीही मार्गदर्शन केले. नामदेवराव परजणे पाटील शिष्यवृत्ती धनादेशाचे वितरण, महिला महाविद्यालयाच्या कृपासिंधू वार्षिक नियतकालिकेचे प्रकाशन, संवत्सर येथील सहाणे टेलर यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप असे विविध कार्यक्रम याप्रसंगी पार पडले. संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे यांनी आभार व्यक्त केले. सोहळ्यासाठी विविध स्तरातील मान्यवर, शासकीय अधिकारी, शिक्षक-पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



