खा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे लोकशाही व समतेचा विचार अधिक ताकदवान – समन्वयक आ. थोरात
आ. थोरातांकडून शेगाव येथील विराट सभेचे उत्कृष्ट नियोजन
खा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे लोकशाही व समतेचा विचार अधिक ताकदवान – समन्वयक आ. थोरात
आ. थोरातांकडून शेगाव येथील विराट सभेचे उत्कृष्ट नियोजन
संगमनेर । विनोद जवरे ।
थोर समाजसुधारक आणि संतांनी दिलेल्या समतेचा विचार हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या रूपात आपल्या सर्वांना दिला आहे. मात्र सध्या लोकशाहीचे काही स्तंभ डळमळीत होत असून पुन्हा एकदा लोकशाही व समतेचा विचार अधिक बळकट करण्यासाठी खासदार राहुल गांधी यांची ही भारत जोडो यात्रा असल्याचे गौरवोद्गार भारत जोडो यात्रेचे समन्वयक व राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.शेगाव येथील भारत जोडो यात्रेच्या विराट सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार राहुल गांधी, प्रभारी एच के पाटील, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण ,पृथ्वीराज चव्हाण, दिग्विजय सिंह, खा. मुकुल वासनिक ,माजी मंत्री यशोमती ठाकूर, अमित देशमुख, आमदार डॉ. सुधीर तांबे ,सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात आदींसह महाराष्ट्रातील विविध प्रमुख नेते उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, शेगाव मधील भारत जोडोची ही सभा विराट आणि अविस्मरणीय असून लाखो लोक या सभेला उस्फूर्तपणे उपस्थित आहेत. कन्याकुमारी पासून निघालेल्या या यात्रेत विविध पक्ष, पुरोगामी संघटना, लोकशाहीवर विश्वास असणारे विविध नागरिक, गरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत .या पदयात्रेदरम्यान राहुलजी या गोरगरिबांना भेटून त्यांची आपुलकीने चौकशी करत आहेत. गरीब माउलींच्या डोळ्यातील अश्रू पुसत आहेत. या संपूर्ण पदयात्रेत राहुलजींनी आपुलकी व प्रेम वाटण्याचे काम केले आहे.दररोज 25 किलोमीटर चालताना ऊन ,वारा, पाऊस, थंडी अशा वातावरणात लाखो लोकांना ते भेटत आहेत. ही चालण्याची शक्ती त्यांना जनतेच्या प्रेमातून मिळालेली आहे. देशाच्या लोकशाही वर काही संकट आले असून लोकशाही व राज्यघटना अधिक बळकट करण्यासाठी संतांनी आणि महापुरुषांनी दिलेला समतेचा विचार घेऊन ते लढत आहेत.
महात्मा गांधींनी दिलेले स्वातंत्र्य, आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना यातून 75 वर्ष आज भारत पूर्ण करत आहेत. भारताने केलेली प्रगती ही काँग्रेसच्या आणि लोकशाहीच्या विचारातून झालेली आहे .मात्र सध्या लोकशाहीचे आधारस्तंभ डळमळीत होऊ पाहत आहेत त्यांना पुन्हा ताकदवान करण्यासाठी ही भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरणार आहे. देगलूर मध्ये या यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून ही ऐतिहासिक भारत जोडो पद यात्रा इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिली जाणार आहे .नफरत छोडो, भारत जोडो ही घोषणा देशातील प्रत्येक नागरिकाची असून काँग्रेसने कायम देश जोडण्याचे काम केले आहे .खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही ते म्हणाले . या प्रसंगी खासदार राहुल गांधींसह नाना पटोले, अशोकराव चव्हाण, यशोमती ठाकूर, मुकुल वासनिक यांचीही भाषणे झाली.