अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी मिळणार अनुदान- कृषी अधिकारी सोनवणे
अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी मिळणार अनुदान- कृषी अधिकारी सोनवणे
कोपरगाव । विनोद जवरे ।
राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना आपल्या शेतासाठी शासनाकडून ९० टक्के अनुदानावर ठिबक सिंचन मिळणार असल्याची माहिती कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुका कृषी अधिकारी सोनवणे यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, पृथ्वीतलावर गेल्या काही वर्षापासून पाण्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असून शेतकऱ्यांना दोन पिके घेणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे पाण्याची बचत करणे ही काळाची नितांत गरज होऊन बसली असून शेती करतांना फक्त ठिबक सिंचन मुळेच पाण्याची बचत होऊ शकते हे गेल्या काही वर्षांपासून सिद्ध झाले आहे परंतु हे ठिबक सिंचन अनुसूचित जाती व जमातीमधील शेतकऱ्यांना घेणे शक्य होत नसते त्यामुळे याच बाबीचा विचार करत शासनाच्या वतीने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ठिबक सिंचन हे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या महाडीबीटी या पोर्टलवर मंगळवार दि १५ नोव्हेंबर पासुन फॉर्म नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून याची अंतिम मुदत शुक्रवार दि २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आहे तरी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंद करत या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी केले आहे.