ब्रेकिंग

साकूरच्या बिरोबा देवस्थानाच्या विकासाचा ‘रोडमॅप’ तयार; आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतला कामांचा आढावा

“साकूरला पहिल्या प्राधान्याने काम करणे हा कायम हेतू”

साकूरच्या बिरोबा देवस्थानाच्या विकासाचा ‘रोडमॅप’ तयार; आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतला कामांचा आढावा

जाहिरात मो-7756045359

“साकूरला पहिल्या प्राधान्याने काम करणे हा कायम हेतू”

संगमनेर । प्रतिनिधी । साकूर आणि परिसरातील नागरिकांशी असलेले आपले नाते केवळ राजकीय स्वरूपाचे नसून, येथील श्रद्धास्थानांशीही आपले भावनिक नाते असल्याचे सांगत आमदार सत्यजीत तांबे यांनी साकूरच्या विकासकामांना सातत्याने प्राधान्य देण्याची भूमिका मांडली. तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त साकूर येथील श्री विरभद्र बिरोबा देवस्थानला भेट देऊन त्यांनी बिरोबारायांचे दर्शन घेतले.

“बिरोबाराया हे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या जागृत देवस्थानची सेवा करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी श्रद्धेची बाब आहे. संधी मिळेल तेव्हा साकूर जिल्हा परिषद गटासाठी पहिल्या प्राधान्याने काम करणे हा माझा कायम हेतू राहिला आहे,” असे तांबे यांनी यावेळी स्पष्ट केले.बिरोबारायांशी आपले जुने नाते असल्याचे सांगताना तांबे यांनी २०१२ सालच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळापासूनचा संदर्भ दिला. देवस्थानला भेट दिल्यानंतर सेवा करण्याची भावना आपोआप निर्माण होते आणि केलेल्या सेवेची पोचपावती बिरोबाराया देतात, हा आपला आजवरचा अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले.दरम्यान, देवस्थान परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची तांबे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या ५० लाख रुपयांच्या निधीतून दर्शन रांगा तसेच अन्य कामे सुरू आहेत. यापूर्वी देवस्थान परिसरात २० लाख रुपयांच्या खर्चातून भक्तनिवास उभारण्यात आला असून जिल्हा परिषदेकडूनही १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.देवस्थानला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात असल्याचे तांबे यांनी सांगितले. २०२३ मध्ये आमदार झाल्यानंतर देवस्थानच्या विकासासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, ठेकेदारांची काही देयके रखडल्याने कामांना अडथळे आले असून काही कामे अपूर्ण राहिली आहेत. निधी उपलब्ध होत जाईल, त्यानुसार उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.बिरोबा देवस्थानच्या भविष्यातील विकासासाठी सुमारे ३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहितीही तांबे यांनी दिली. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या आराखड्यातील कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

“नवीन कामांपेक्षा, आधी रखडलेली कामे पूर्ण व्हावीत”

सरकारच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा संदर्भ देत तांबे यांनी निधीच्या उपलब्धतेबाबतही भूमिका मांडली. नवीन कामांना मंजुरी देण्यापूर्वी आधीच सुरू असलेली आणि निधीअभावी रखडलेली कामे पूर्ण करण्याला सरकारने प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, युवा नेते बाळासाहेब सागर, सरपंच सचिन सोनवणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!