श्रावणी सोमवारनिमित्त खांडेश्वर, रामेश्वर मंदिरात आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतले दर्शन
“ही तीर्थक्षेत्रे संगमनेरची आध्यात्मिक ओळख”

श्रावणी सोमवारनिमित्त खांडेश्वर, रामेश्वर मंदिरात आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतले दर्शन


“ही तीर्थक्षेत्रे संगमनेरची आध्यात्मिक ओळख”
संगमनेर । प्रतिनिधी । श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त आमदार सत्यजीत तांबे यांनी आज खांडगाव येथील श्री क्षेत्र खांडेश्वर आणि धांदरफळ येथील श्री क्षेत्र रामेश्वर मंदिरात दर्शन घेत विधिवत पूजा-अभिषेक केला. यावेळी त्यांनी भाविकांशी संवाद साधत सर्वांच्या सुख-समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली.

यावेळी बोलताना आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, श्रावणी सोमवारनिमित्त संगमनेर तालुक्यासह अकोले, सिन्नर, राहाता, जुन्नर व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या तीर्थक्षेत्रांना भेट देतात. खांडेश्वर देवस्थानचा गेल्या काही वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून सुंदर विकास झाला असून वृक्षारोपणामुळे परिसर निसर्गरम्य झाला आहे. देवस्थानचे अध्यक्ष व त्यांच्या टीमने केलेले काम कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.रामेश्वर मंदिराच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी लोकसहभाग व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मंदिर परिसराचा विकास झाला असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तीर्थक्षेत्र विकासासाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी देत या विकासाला सुरुवात केली, असे नमूद केले.

रामेश्वर क्षेत्राला प्रभू श्रीरामांच्या वास्तव्यामुळे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असून आज राज्यभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. प्रत्येकाने एकदा तरी खांडेश्वर-कपालेश्वर आणि रामेश्वरला भेट देऊन या परिसरातील विकास पाहावा, असे आवाहन आमदार तांबे यांनी केले. यावेळी त्यांनी सर्व संगमनेरकरांना श्रावणी सोमवारच्या शुभेच्छाही दिल्या.



