शेतकऱ्यांच्या मोटार केबल चोरीचा पर्दाफाश; अकोले पोलिसांकडून ८ आरोपी जेरबंद
२ लाख ४१ हजारांचा तांब्याचा मुद्देमाल जप्त, वाहनासह मोबाईलही हस्तगत

शेतकऱ्यांच्या मोटार केबल चोरीचा पर्दाफाश; अकोले पोलिसांकडून ८ आरोपी जेरबंद


२ लाख ४१ हजारांचा तांब्याचा मुद्देमाल जप्त, वाहनासह मोबाईलही हस्तगत
अकोले । प्रतिनिधी । अकोले तालुक्यातील कोतुळ व परिसरातील शेतकऱ्यांच्या मोटारींच्या इलेक्ट्रिक केबल चोरीच्या गुन्ह्याचा अकोले पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोतुळ गावच्या शिवारात मोठ्या प्रमाणावर केबल चोरी करणाऱ्या आठ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून सुमारे २ लाख ४१ हजार २०० रुपये किमतीचा तांब्याच्या तारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या मोटार केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आणत तब्बल २ लाख ४१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची उल्लेखनीय कामगिरी या अधिकारी-कर्मचारी पथकाने केली आहे. त्यांच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.
याबाबत कोतुळ येथील शेतकरी दिपक गंगाधर देशमुख (वय ४७) यांनी अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपींचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी कारवाई करत करण रामभाऊ मध्ये (वय २३, रा. पांगरी, ता. अकोले), किरण संतोष मध्ये (वय २४, रा. धांदरफळ खुर्द, ता. संगमनेर), साहिल बुद्रा गिळे (वय २२, रा. एकलव्यनगर, नांदूर शिंगोटे, ता. सिन्नर), अविनाश कैलास मध्ये (वय २२, रा. एकलव्यनगर, नांदूर शिंगोटे, ता. सिन्नर), राजेंद्र सोमनाथ वर्पे (वय ३२, रा. वडगाव, ता. संगमनेर), गुलाम रसूल इसाक शहा (वय ४३, रा. आसवी खुर्द, ता. संगमनेर), अब्बास सुभान तांबोळी (वय ६६, रा. चितळी रोड, अहिल्यानगर) आणि प्रशांत रामदास डमाळे (वय ४३, रा. लोणी, ता. राहाता) यांना ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून केबलमधील तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या. यामध्ये सुमारे २६ किलो वजनाची तांब्याची तार किंमत १ लाख २६ हजार रुपये तसेच सुमारे ४६ किलो वजनाची तांब्याची तार किंमत ५५ हजार २०० रुपये, असा एकूण २ लाख ४१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.याशिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीची लाल रंगाची स्विफ्ट कार आणि सुमारे १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केला आहे.
अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर येथील सायबर सेल पथकातील पोहेकॉ सचिन धनाड व पोहेकॉ वेताळ यांनीही तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
सदरची कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंमका, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अकोले पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप कोळी तसेच सपोनि संदीप हजारे, पोहेकॉ/५३९ अनिल जाधव, पोहेकॉ विजय फटांगरे, पो.कॉ. महेंद्र गुंजाळ, पो.कॉ. सुहास गारे, पोहेकॉ अविनाश गोडे, पो.कॉ. योगेश जोरगीर, पोहेकॉ मंगेश बिडवे आणि पो.कॉ. मच्छिंद्र इंगळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.



